खा. श्रीकांत शिंदे म्हणाले, आघाडी धर्म पाळला जात नाही | पुढारी

खा. श्रीकांत शिंदे म्हणाले, आघाडी धर्म पाळला जात नाही

कराड ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये पद व निधीचे वाटप ठरले होते; पण या आघाडी धर्माचे पालन होताना दिसत नाही. ज्या-ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम आहे, त्या-त्या ठिकाणी शिवसेनेचे खच्चीकरण होताना दिसत आहे. माझ्यासह सेनेच्या अनेक खासदारांना हाच अनुभव आला आहे. शिवसेनेच्या वाट्याचा निधी दिला जात नाही. याबाबत मुख्यमंत्री तसेच पक्ष अध्यक्षांसमोर हा विषय मांडला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, माजी जिल्हाप्रमुख हर्षद कदम, तालुका प्रमुख नितीन काशिद, तालुका प्रमुख शशिकांत हापसे, राजेंद्र माने, शहर प्रमुख शशिराज करपे, मधूकर शेलार, दिलीप यादव, शहाजी जाधव, काकासाहेब जाधव, माणिक आतरकर, महिला आघाडीचा जिल्हा संघटीका अनिताताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा. श्रीकांत शिंदे शिवसंपर्क अभियानानांतर्गत सातारा जिल्हा दौर्‍यावर आहेत. शनिवारी त्यांनी कराड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
खा. शिंदे म्हणाले महाराष्ट्रात आघाडी धर्माचे पालन होत नसल्याचे आमच्या लक्षात आले आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना निधीचे वाटप ठरले होते. जिल्ह्यात पालकमंत्री ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाला 60 टक्के विकासनिधी व अन्य दोन पक्षांना प्रत्येकी 20 टक्के याप्रमाणे निधी वाटपाचे ठरले आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. निधीची पळवापळवी होताना दिसत आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. माझ्यासह सर्व खासदारांना हाच अनुभव आहे. आघाडी धर्म पाळताना अन्य पक्षांचाही विचार करावा, असे राष्ट्रवादीला उद्देशून खा. श्रीकांत शिंदे म्हणाले.

निधी शिवसेनेचा व भुमीपूजन दुसराच पक्ष करून जातो, अशा कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत. पक्षाच्या वरिष्ठांनी याची दखल घेतली पाहिजे. आघाडीची त्रिसूत्री पाळली पाहिजे.

शिवसेना ग्रामीण भागात पक्ष संघटन मजबूत करत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंपर्क अभियान राबवून पदाधिकारी, शिवसैनिकांशी संवाद साधला जात आहे. विकास निधीची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या ठिकाणी सेनेला त्यांच्या वाट्याचा निधी मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही राहणार आहे. आगामी निवडणुका आघाडी एकत्रित लढवेल की स्वतंत्र या प्रश्नावर खा. शिंदे म्हणाले, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. तरीही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे, असे नितीन बानुगडे -पाटील यांनी सांगितले.

‘ईडी’च्या कारवाया सूड भावनेने…

‘ईडी’च्या राज्यभर विशेष करून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सुरू असणार्‍या कारवाया या सूड भावनेने सुरू आहेत. संपूर्ण महाराष्ट्र हे पाहत आहे. सत्ता नसल्याने भाजपची तडफड सुरू आहे. कोणत्याही मार्गाने सरकार पाडण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत; पण आघाडीचे सरकार संपूर्ण कार्यकाल पूर्ण करेल, असा विश्वास खा. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

Back to top button