कराड तालुका कृषी वार्तापत्र : शेतकरी वळला सोयाबीन पिकाकडे | पुढारी

कराड तालुका कृषी वार्तापत्र : शेतकरी वळला सोयाबीन पिकाकडे

कराड : अशोक मोहने : यावर्षी मान्सून पंधरा दिवस अगोदर सुरू होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने शेतकर्‍यांनी खरीपाची तयारी सुरू केली आहे. शिवारात खरीपासाठी शेत तयार करण्याची लगबग सुरू असताना कृषी विभागानेही खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणे पुरेशा प्रामाणात उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी अन्य पिकांच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र वीस टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

तालुक्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र 13 हजार 930 येवढे आहे. या खरीप हंगामात 16 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होईल. मागील वर्षी 14 हजार 472 हे. क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती. यावर्षी वीस टक्क्यांनी सोयाबीनचे क्षेत्र वाढेल.
सोयाबीन पिकाला गेल्या वर्षी चांगला दर मिळाला होता. शिवाय कमी कालावधीत उत्पादन मिळवून देणारे हे पीक आहे. बदली पीक म्हणून शेतीसाठी सोयाबीन पिकाचा चांगला उपयोग होतो. ऊस पिकात अंतरपिक म्हणूनही सोयाबीन घेता येते. या सर्व बाजूंचा विचार करून शेतकरी सोयाबीनला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी प्रतिवर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढताना दिसत आहे.

सोयाबीनचे नवीन वाण बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये केडीएस 726, केडीएस 753, केडीएस 344, व्हीएस 288 या वाणांना शेतकरी अधिक पसंती देताना दिसत आहेत. सरासरीपेक्षा अधिक उत्पादन देणारे हे वाण आहेत. शिवाय तांबेरा रोगास प्रतिबंध करणारे हे वाण असल्याने शेतकरी या वाणांची प्राधान्यांने लागवड करत आहेत.

भुईमूगाचे सर्वसाधारण क्षेत्र 10 हजार 204 हेक्टर आहे. मागील वर्षी 9 हजार 517 हेक्टर क्षेत्रावर भुईमूगाची लागवड झाली होती. यावर्षी यामध्ये वाढ होणार असून 11 हजार हेक्टर क्षेत्रावर भुईमूगाची लागवड होईल.
खरीप ज्वारी व भाताचे क्षेत्र कमी होणार आहे. खरीप ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र 8 हजार 723 हेक्टर आहे. या हंगामात 6 हजार 800 हे. क्षेत्रावर खरीप ज्वारीची पेरणी होईल. तर भाताचे सर्वसाधारण क्षेत्र 8 हजार 497 आहे. 7 हजार 500 हे. क्षेत्रावर भाताची पेरणी होईल.कडधान्यामध्ये तूर, उडीद, मूग याचे सरासरी क्षेत्र या हंगामात घटणार आहे.

कराड तालुक्यात खतांची 339, बियाणांची 256 व किटकनाशकांची 241 दुकाने आहेत. शेतकर्‍यांना खतांच्या किंमती किंवा उपलब्धतेबद्दल अडचणी आल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करावा. कोणत्याची कंपनीच्या खतांसाठी व ग्रेडसाठी आग्रह धरू नये. कृषी विभागाने वेगवेगळ्या ग्रेडची खते सरळ खतांच्या माध्यमातून कशी तयार करता येतील याची माहिती दिली आहे, याचा अवलंब शेतकर्‍यांनी करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात खते, बियाणांचे नियोजन केले आहे. तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शेतकर्‍यांना खतांच्या किंमती किंवा उपलब्धतेबद्दल अडचणी आल्यास त्यांनी तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करावा.

– रियाज मुल्ला
तालुका कृषी अधिकारी, कराड t

Back to top button