सातारा : कार्यालये, निवासस्थाने दुरुस्तीत भ्रष्टाचार | पुढारी

सातारा : कार्यालये, निवासस्थाने दुरुस्तीत भ्रष्टाचार

सातारा : पुढारी वृत्तसेवा
जलसंपदा विभागाच्या सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ व सिंचन मंडळाकडून करण्यात येत असलेल्या उपविभाग, शाखा कार्यालये व निवासस्थानांच्या देखभाल, दुरुस्ती कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. निकृष्ट झालेल्या या दुरुस्ती कामांची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करावी, अशी मागणी जिल्हावासीयांतून होत आहे.

सातार्‍यात जलसंपदा विभागाच्या जागेवर मेडिकल कॉलेजची उभारणी करण्यात येणार असल्याने पाटबंधारेची काही कार्यालये हलवण्यात आली आहेत. जुन्या इमातींची दुरुस्ती, डागडुजी, रंगरंगोटी करून या इमारतीत कार्यालये शिफ्ट होऊ लागली आहेत. मात्र, या कार्यालये दुरुस्तीच्या कामातही टक्केवारीचा बाजार झाला. उपविभाग, शाखा कार्यालयांवर कोट्यवधी खर्च करून कार्यालये दुरुस्तीची कामे सुरू आहेत; मात्र या कामांचा दर्जा खालावला आहे. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यालय सिंचन व प्रकल्प मंडळाजवळ हलवण्यात आले आहे. या कार्यालयासमोर टाकलेले पेव्हर्स ठेकेदाराने ग्रीटमध्ये नीट बसवलेले नाहीत. त्यावरुन वाहन गेल्यावर प्रचंड आवाज होतो. हे काम टिकणार नसल्याचे जाणकार सांगत आहेत. शिवाय इतर कामांतही तूटफूट होवू लागली आहे. डांबरीकरण निघू लागले आहे. रस्त्याच्या बाजूला बसलले सिमेंट ब्लॉक निघू लागले आहेत. पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धोम पाटबंधारे, उरमोडी उपविभागानेही दुरुस्तीची कामे केली आहेत. प्रकल्प मंडळाच्या जिहे-कठापूर योजनेच्या कार्यालय परिसरातही नवे शेड्स, पेव्हर्स, पार्किंग, अंतर्गत फर्निचर आदि देखभाल व दुरुस्तीची कामे झाल्याचे दिसून येत आहे. कार्यालय दुरुस्तीवरील खर्च आणि प्रत्यक्ष झालेले काम यामध्ये तफावत आढळून येते. करवडी (ता. कराड) येथील पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे कार्यालय नागरिक, शेतकर्‍यांच्या वर्दळीच्यादृष्टीने तसे दुर्लक्षित आहे. या गैरफायदा घेत याही ठिकाणी दुरुस्तीची मोठ्या प्रमाणात काम झाली आहेत.

वडूज येथे सिंचन मंडळाचे कार्यालय आहे. या कार्यालयावर जवळपास 70 ते 80 लाखांची दुरुस्तीची कामे झाली आहेत. या कामातही प्रचंड मलिदा लाटल्याच्या तक्रारी आहेत. सातारा पाटबंधारे प्रकल्प आणि सिंचन मंडळाने देखभाल दुरुस्तीत डांबरीकरण, काँक्रेटिकरण, पार्किंग, रंगरंगोटी, शेड्स, स्वच्छतागृह आदि सुमारे 7 कोटींची कामे केली आहेत. कार्यालयांच्या दुरुस्तीवर झालेला खर्च पाहता त्यामध्ये आणखी थोडा निधी वाढवला असता तर नव्या इमारती उभ्या राहिल्या असत्या, अशा पध्दतीने कामे झाल्याचे दिसून येते. नव्या कामांपेक्षा अभियंत्यांना दुरुस्तीच्या कामातच इंटरेस्ट असल्याचे दिसून येते. दोन्ही मंडळांच्या आवारात गेल्या दोन वर्षांपासून ही कामे सुरु आहेत. आपल्याच मर्जीतील ठेकेदारांना ही कामे देण्यात आली आहेत. ठेकेदार आणि अभियंते यांचे लागेबांधे असल्यामुळे पाटबंधारेच्या दोन्ही मंडळात फक्‍त ठेकेदारच पोसले जातात का? त्यांची सोय पाहूनच कामे काढली जातात का? असा सवाल केला जात आहे. (क्रमश:)

Back to top button