खेड : गोडोलीकरांवर यंदाही पूरस्थितीची टांगती तलवार | पुढारी

खेड : गोडोलीकरांवर यंदाही पूरस्थितीची टांगती तलवार

खेड ; पुढारी वृत्तसेवा : पावसाळा तोंडावर आला तरीही पावसाळी कामांनी वेग घेतलेला नसल्याच्या तक्रारी आहेत. ही कामे आतापर्यंत पूर्ण झालेली नसल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही गोडोली परिसरातील दुकानगाळे, हॉल व नागरिकांच्या घरात पाणी शिरुन लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे. गोडोलीकरांवर पूरस्थितीची टांगती तलवार असून प्रशासनाने उर्वरित काळात वेगाने कामे करण्याची गरज आहे.

बेकायदा कामांमध्ये बड्यांचा समावेश

अजिंक्यतारा किल्ल्यावरुन वाहत येणारे ओढे सातारा शहरातूनच जातात. मात्र गोडोली, माची पेठ येथून विसावा नाक्यावरील कर्मवीर कॉलनी, देवी कॉलनी, यशवंत कॉलनी, माने हॉस्पिटलपर्यंत या ओढ्यांची अक्षरशः गटारे झाली आहेत. अनेक ठिकाणी ओढ्याचे प्रवाह रोखले आहेत. यामुळे रस्त्याच्या एका बाजूस इमारत तर दुसर्‍या बाजूला ओढा वाहत आहे. बेकायदा बांधकामे करणार्‍यांमध्ये बड्यांचा समावेश आहे. अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यास कचरत असल्याच्या तक्रारी आहेत.

ओढ्याची झाली गटारे

शहरातील सर्व गटारे बंदिस्त करण्यावर भर दिला जात आहे. शहरात डासांचा प्रादुर्भाव हऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी गटारांवरील लॉफ्ट उघडलेच जात नाहीत. यामध्ये कचरा तुंबून राहिलेला असतो. अतिक्रमणांमुळे अनेक ठिकाणी ओढ्यांचा प्रवाह खंडीत झाला आहे. या खंडीत प्रवाहांमध्ये कचरा, प्लॅस्टिक टाकले जात असल्यामुळे ओढ्यांचीही गटारे झाली आहेत. मुसळधार पावसामुळे या गटारातील आणि ओढ्यांतील पाणी रस्त्यावर येते. पालिकेकडून गटारांची साफसफाई वेळच्या वेळी होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

अनेक ठिकाणी बदलले नैसर्गिक पात्र

गोडोलीसह शहर व उपनगरातील अनेक ठिकाणी ओढे आणि नाल्यावर मोठ्या प्रमाणावर बांधकामे करुन अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी मिळकतधारकांनी भराव व सिमेंटच्या पाईप टाकून ओढ्याची जागा बळकावली आहे. अनेक ठिकाणी इमारतींसाठी ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह वळवण्यात आला आहे. अशा प्रकारे अनेक ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे ओढा आकुंचला आहे. ओढ्यावर अतिक्रमण होत असताना पालिका, ग्रामपंचायत का डोळेझाक करते असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आयत्या जागा गळपटण्यासाठी किती तोडपाणी केले याचीही चौकशी करण्याची गरज असून आपत्ती घडल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का? असा सवालही गोडोलीतील नागरिकांतून होत आहे.

दुकानदारांना पंप घेवूनच बसावे लागणार

दरवर्षी पावसाळा पूर्व कामे करूनही पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरते, चेंबर तुंबतात, रस्त्यावर पाणी साचते. यामुळे पावसाळी कामे होण्यावर संशय घेतला जातो. काही ठिकाणी ओढ्याच्या काठापर्यंत बांधकामे आली आहेत. यापूर्वी गोडोली परिसरात दुकान गाळ्यांमध्ये, घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने हाहा:कार उडाला होता. गाळेधारकांनी पंपीग करुन पाणी काढले होते. मात्र व्हायचे ते नुकसान झालेच. त्यामुळे यंदाही गोडोली नाका परिसरातील गाळेधारक, देवी कॉलनी, माने हॉस्पिटल, मानसी डुप्लेक्स परिसरातील नागरिक सुळावर आहेत. अतिक्रमणे जैसे थे असल्यामुळे यावर्षी पंप घेऊनच दुकानदारांना दुकानात बसण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने यंत्रणेने सक्षमतेने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात तरी दिलासा मिळावा

यावर्षी गोडोली परिसरातील संभाव्य पूरपरिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले असले तरी अद्यापही अपेक्षित कामे वेगाने झाली नसल्याच्या तक्रारी आहेत. या भागातील सर्व ओढ्यांची साफसफाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. विसावा नाक्यावरील देवी कॉलनी, माने हॉस्पिटल आणि कल्याणी हायस्कूलच्या मागून जाणारा ओढा अरुंद होत चालला आहे. शहरातील अन्य ओढ्यांचीही अशीच परिस्थिती आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नगरपालिकेकडून ओढे, नाले स्वच्छतेची मोहीम आखली जाते, त्यासाठी लाखो रूपये खर्च केले जातात. मात्र अपेक्षित स्वच्छता होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाऊस पडल्यानंतर ठिकठिकाणी नाले- ओढे घाणीने तुंबत असतात. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तरी हे चित्र दिसू नये, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

ओढा रोखल्याने पाणी बेसमेंट व गाळ्यात

वाय. सी. कॉलेज परिसरात तर चक्क ओढ्यावरच इमारत उभी करण्यात आली आहे. मिळकतदाराने सुळाच्या ओढ्याचा मुख्य उघडा प्रवाह जलवाहिन्यांचा वापर करुन बंदिस्त केला आहे. मुख्य प्रवाह रोखला गेल्यास पाणी बेसमेंट मधील गाळ्यात जाऊ शकते. ओढ्यावर अतिक्रमण करणार्‍या मिळकतधारकांनी ओढ्याच्या पाण्याला वाट करण्याची तसदीही केवळ स्वतःच्या सोयीसाठीच घेतल्याचे दिसत आहे. जलवाहिन्यांतील पाणी रस्त्यापलीकडील ओढ्यात पाण्यात जाते. मात्र मुसळधार पावसात जेव्हा ओढे तुडूंब भरून वाहू लागतात, तेव्हा ही उपाययोजना तुटपुंजी ठरते. पाण्याचा मोठा लोंढा वाट फुटेल तिकडे वाहू लागतो आणि त्याला सर्वसामान्य दुकानदार, नागरिक बळी पडतात. अशावेळी रस्ते ही पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद पडते.

Back to top button