सातारा : कळशीभर पाण्यासाठी उतरावे लागते विहिरीत | पुढारी

सातारा : कळशीभर पाण्यासाठी उतरावे लागते विहिरीत

सणबूर : तुषार देशमुख

डोंगर कपारीत वसलेल्या आंब्रुळकरवाडी (भोसगांव) येथे पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांची जीवघेणी कसरत सुरू आहे. कळशीभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना विहिरीत उतरावे लागत आहे. तसेच रात्रभर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पावसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाटण तालुक्यातील आंब्रुळकरवाडी सारख्या दुर्गम वाडीतील ग्रामस्थांंना घोटभर पाण्यासाठी 50 ते 60 फुट खोल विहिरीत उतरावे लागत आहे. पाण्यासाठी एका बोअरवर दिवसभर ताटकळत बसावे लागते. तिथे तहान भागत नसल्याने रात्री भाड्याचा ट्रॅक्टर करुन बाहेरून पाणी भरावे लागते, अशी अवस्था आंब्रुळकरवाडीची झाली आहे.

पाणी टंचाईमधून मुक्ती मिळवण्यासाठी गावपातळीवरील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये लोकवर्गणीतून दोन ठिकाणी कूपनलिका खोदण्यात आल्या. त्याचा फारसा उपयोग झाला नाही आणि एप्रिल-मे महिन्यात प्रचंड पाणी टंचाईच्या झळा आंब्रुळकरवाडीला सोसाव्या लागत आहे. यातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे देखील पाठपुरावा करण्यात आला. पाणी योजनेसाठी भूकंप पुनर्वसन योजनेतून 15 लाख रुपये मंजूर करून आणले आहेत.

परंतु अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे ही योजना बारगळली आहे. वास्तविक शासनाने दोन वर्षांपूर्वीच जलजीवन मिशन ही मोहिम हाती घेतली असून यामध्ये शंभर दिवसांत घराघरांत नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार भूकंप पुनर्वसन योजनेतून आंब्रुळकरवाडीचा सर्व्हे देखील झाला आहे. नळ योजनेची मोजमापे टाकून त्याचा आराखडा शासनाकडे पाठवण्यात आल्याचे ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या अधिकार्‍यांनी ग्रामस्थांना सांगितले. मात्र त्यानंतरही शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याचे सांगत ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. एखाद्या ग्रामस्थाचे बरे वाईट झाल्यास कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही लोकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न…

आंब्रुळकरवाडी गावात गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई सुरु आहे. अधिकारी लक्ष घालत नसल्याने मंजूर पाणी योजना रखडली आहे. मात्र असे असूनही आंब्रुळकरवाडी टंचाई मुक्त झाली असे दाखवून शासनाची आणि ग्रामस्थाची दिशाभूल करण्याचा काहींचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ना. शंभूराज देसाई यांनी अधिकार्‍यांना सूचना करून त्वरित उपाययोजना करण्याची सूचना करावी, अशी मागणी सुधाकर पवार यांच्यासह ग्रामस्थांनी केली.

Back to top button