सातारा : जिल्हा परिषदेचा बिगुल सप्टेंबरमध्ये? | पुढारी

सातारा : जिल्हा परिषदेचा बिगुल सप्टेंबरमध्ये?

सातारा : पुढारी वृत्तसेवा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात घेता येणे शक्य नाही. त्यामुळे दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. सातार्‍यात पावसाळ्यात जोरदार पाऊस असल्याने सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सप्टेंबर किंवा दिवाळीदरम्यानच होण्याची शक्यता आहे. याबरोबर निवडणूक कार्यक्रम कसा घेणार? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

पावसाळा ऐन तोंडावर आला आहे. त्यामुळे आता निवडणुका घेणे उचित होणार नाही. यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात टप्प्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात राज्य निवडणूक आयोगाने केली होती. याला न्यायालयाने मान्यत देत परिस्थितीनुरूप कार्यक्रमात बदल करण्याचीही मुभा दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगापुढील पेच कमी झाला आहे. याबाबत निवडणूक कार्यक्रम कसा घेणार? याचे सादरीकरण सर्वोच्च न्यायालयात करावे लागणार आहे. जुलै महिन्यात याबाबत सुनावणी होणार आहे. त्यानंतर सातार्‍याच्या निवडणुकीबाबत स्पष्टता येणार आहे.

ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे तेथील निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सातारा जिल्ह्यात मोठा पाऊस असतो. जावली, महाबळेश्‍वर, पाटण हे तालुके दुर्गम आहेत. तर वाई व सातार्‍याचा काही भाग दुर्गम आहे. या भागात या कालावधीत निवडणुका घेणे अशक्य आहे. सातारा जिल्ह्यात यंदाच्या निवडणुकीसाठी 9 गट व 18 गण वाढले आहे. त्यासाठी प्रभागरचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रभाग रचनेनंतर महाबळेश्‍वर तालुक्यातील 2 गट व 4 गण, वाई तालुक्यातील 5 गट व 10 गण, जावली तालुक्यातील 3 गट व 6 गण, फलटण तालुक्यातील 9 गट व 18 गण,माण तालुक्यातील 5 गट व 10 गण, खटाव तालुक्यातील 8 गट व 16 गण, कोरेगाव तालुक्यातील 6 गट व 12 गण, सातारा तालुक्यातील 10 गट व 20 गण, खंडाळा तालुक्यातील 3 गट व 6 गण,पाटण तालुक्यातील 8 गट व 16 गण,कराड तालुक्यातील 14 गट व 28 गणांसाठी धूमशान होणार आहे. प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर केल्यानंतर 27 जून रोजी यावर अंतिम शिक्‍कामोर्तब होणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत केली जाणार आहे. यादरम्यान पावसाळा सुरू होत आहे.

नव्याने सातारा जिल्हा परिषद व 11 पंचायत समित्यांची निवडणुक घेण्यासाठी मोठा फौजफाटा लागणार आहे. पावसाळ्यात कर्मचार्‍यांचीही आबदा होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करता सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा बिगुल हा सप्टेंबर महिन्यातच लागण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचलत का ?

Back to top button