कराड : अंकिताच्या जिद्दीचा हेळगावकडून सन्मान | पुढारी

कराड : अंकिताच्या जिद्दीचा हेळगावकडून सन्मान

मसूर : पुढारी वृत्तसेवा

सैन्यात भरती होऊन हेळगाव ता. कराड या गावातील पहिली महिला सैनिक होण्याचा मान मिळवलेल्या अंकिता नलवडे हिचे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून हेळगाव ता. कराड येथे नुकतेच आगमन झाले. अंकिताच्या या जिद्दीला सलाम करत तिच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी तिचे जल्लोषात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करत घोड्यावर बसून गावातून तिची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

गेल्या काही वर्षांत सैन्यात भरती होणार्‍यांत तरुणींची संख्या वाढली आहे. अंकिता नलवडे हिने तिने सैन्यात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगले होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सैन्यात किंवा पोलिसांत भरती होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी दररोज अभ्यासाबरोबरच सराव करण्यासाठीही तिने सुरुवात केली होती. पदवीच्या अंतिम वर्षात असतानाच तिची सैन्यात सशस्त्र सीमा बलसाठी निवड झाली. तिने सन 2018 साली लेखी परीक्षा दिली होती, तर सन 2019 मध्ये रायगड येथे फिजिकल टेस्ट पूर्ण केली होती. 2020 ला पुणे येथे मेडिकल टेस्ट पूर्ण झाल्यानंतर एप्रिल 2020 मध्ये तिची सशस्त्र सीमा बल मध्ये निवड झाली. गतवर्षी 20 एप्रिल 2021ला मध्यप्रदेशातील भोपाळ येथील सेंटरवर प्रशिक्षणासाठी ती रवाना झाली होती. एक वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण करून नुकतेच तिचे हेळगावात आगमन झाले. तिच्या कुटुंबीयांसह ग्रामपंचायत तसेच गावातील विविध संस्था व विविध सार्वजनिक मंडळांच्या वतीने तिचे गावच्या प्रवेशद्वारावरच मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. गृहिणींनी औक्षण केले तर माजी सरपंच बाळासाहेब जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, सदाशिव पवार, रामचंद्र पाटील, श्रीमंत सूर्यवंशी, वडील रघुनाथ नलवडे आदींनी तिचे स्वागत केले.

सैन्यदलात भरती होऊन मी देशसेवेचे व माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मुलींनी सैन्यदलात भरती होऊन देशसेवेसाठी पुढे यावे. माझे कुटुंबीय माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने मी हे यश मिळवू शकले.
-अंकिता नलवडे, हेळगाव.

Back to top button