उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोयना विभागाचा कायापालट करणार | पुढारी

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोयना विभागाचा कायापालट करणार

पाटण ; पुढारी वृत्तसेवा : राज्याला वीज व पाणी देणार्‍या कोयना विभागाचा कायापालट करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच कोयनेचे बंद पडलेले बोटिंग व मासेमारी याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर होतील. कोयनेला पर्यटन विकास वाढीसह धरणग्रस्तांच्या उर्वरित समस्याही डिसेंबरपर्यंत किंवा जास्तीत जास्त मार्च 2023 पर्यंत सोडवण्याचा मानस असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

कोयनानगर विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पाटण तालुक्यात अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या मोठ्या प्रमाणात कोळसा टंचाई आहे. जलविद्युत प्रकल्प सोईस्कर आहेत. भविष्यात सौर ऊर्जा प्रकल्पांवर ज्यादा लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योगपती, मोठे ग्रुप पुढे येत असल्याने यातूनच चांगले प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्याचा मानस आहे.

कोयनेचे बंद पडलेले बोटिंग, मासेमारी याबाबत पोलिसांचा अहवाल तयार होत असून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. स्थानिक वन, पोलिस, वन्यजीव, जलसंपदा या विभागांचे अहवाल व स्थानिकांच्या मागणीनुसार येथे पर्यटन क्षेत्राला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांच्या नहिंबे गावातील संबंधितांचे संकलन यादी बंधपत्र याबाबत कार्यवाही सुरू आहे. वन्यजीव विभागाच्या दिरंगाईच्या तक्रारीही असून याबाबत लवकरच प्रशासकीय बैठक घेऊन संबंधितांना त्यांच्या मागणीनुसार भरपाई देण्याचा प्रयत्न करू .

राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राष्ट्रवादीविषयी नाराजी, खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांचे आरोप यासह केतकी चितळेचे शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट याबाबत विचारलेल्या विविध प्रश्‍नांवर बोलण्याचे टाळत या सर्वापेक्षा राज्यासह देशात अनेक महत्वाचे प्रश्‍न आहेत.

आम्हाला अशा राजकीय चर्चांपेक्षा जनसामान्यांचे व राज्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षात काही तुरळक मतभेद असले तरी भांड्याला भांडे लागते. त्याप्रमाणेच या गोष्टी असतात. मात्र जनहितासाठी महाविकास आघाडी भक्कम आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

40 मेगावॉट वीजगृहाचे काम सुरू करणार…

कोरोनामुळे तब्बल दोन वर्षे विकास कामांवर विपरीत परिणाम झाला. त्याचाच एक भाग म्हणून कोयना धरण पायथ्याशी असणार्‍या नव्या 40 मेगावॉट क्षमतेच्या वीजगृहाचे काम बंद आहे. लवकरच ऊर्जा व जलसंपदा विभागाच्या माध्यमातून हे कामही पुढे नेले जाईल.

Back to top button