कराडात घरफोडी; साडेबारा लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

कराडात घरफोडी; साडेबारा लाखांचा ऐवज लंपास

कराड : पुढारी वृत्तसेवा
घर मालक सुट्टीनिमित्त कुटुंबीयांसमवेत फिरण्यास गेले असता शहरातील बनपुरीकर कॉलनी येथील बंद असलेला बंगला फोडून चोरट्यांनी सुमारे साडेबारा लाखांचा ऐवज लंपास केला. बंगल्यातील कपाट उघडून त्यातील डायमंड, सोन्या-चांदीचे दागिने व अंदाजे पन्‍नास हजार रोख रक्‍कम चोरट्यांनी लंपास केली. शनिवारी (दि. 14) रात्री ही घटना घडली. घटनास्थळी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत या घरफोडीचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, बनपुरीकर कॉलनी येथे वृषाली पाटील यांचा बंगला आहे. या बंगल्यामध्ये त्या पती व मुलीसमवेत राहतात. दरम्यान मुलीला सुट्टी असल्यामुळे ते फिरण्यासाठी बाहेर गावी गेले होते. तर सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने व नातेवाईकांची लग्न असल्याने त्यांनी डायमंड व सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घरी कपाटात ठेवली होती. मंगळवारी त्या पती व मुलगी समवेत फिरण्यास गेल्या व बुधवारी सायंकाळी पुन्हा कराडमध्ये आल्या. एक दिवस थांबून सुट्टी असल्याने शुक्रवारी त्या पुन्हा कुटुंबियांसमवेत फिरण्यास गेल्या.

फिरण्यास जात असताना त्यांनी कामगार मावशीला घरी लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार कामगार मावशी शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बंगल्यावरती येऊन बंगल्यातील लाईट लावली. त्यानंतर पुन्हा दरवाजा व गेटला कुलूप लावून त्या निघून गेल्या. दरम्यान, रविवारी सकाळी कामगार मावशींना बंगल्यावर आल्यानंतर मुख्य गेटचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी वृषाली पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.

वृषाली पाटील यांनी त्वरित कराडकडे धाव घेतली. कराडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी आपला बंगला चोरट्यांनी फोडला असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना बंगल्यातील कपाट व कपाटातील लॉकर उघडे असल्याचे दिसले. तसेच बेडवर कपडे विस्कटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी घरफोडीची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानुसार पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांना सूचना केल्या. सायंकाळच्या सुमारास ठसेतज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत घरफोडीच्या घटनेतचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती.

Back to top button