सातारा : ऑर्डर द्यायचा अन् मोबाईल घेवून पळून जायचा | पुढारी

सातारा : ऑर्डर द्यायचा अन् मोबाईल घेवून पळून जायचा

सातारा : विठ्ठल हेंद्रे
सातारा शहरात आईस्क्रीम व ताक विक्री करणार्‍या व्यावसायिकांना पार्सल करुन देण्याची ऑर्डर दिल्यानंतर ‘एक फोन करतो. तुमचा फोन द्या,’ असे सांगून गंडा घालण्याचा नवा फंडा समोर आला आहे. फोन लावण्याचा बहाणा करुन मोबाईल घेवून पळून जाणार्‍या पुण्याच्या भामट्याला सातारा शहर पोलिसांनी नुकतीच अटक केली. पोलिसांनी दोन मोबाईल जप्‍त केले असून या पाठीमागे मोठी टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असेच काही प्रकार घडल्याचेही समोर येत आहे.

वसीम ईस्माईल शेख (वय 31, रा.हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला पोलिसांनी सातारा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. संशयित चोरटा सातार्‍यात मार्च महिन्यात चोर्‍या करण्यासाठी आला होता. पहिली चोरी 30 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता पोवई नाक्यावरील शिक्षक बँकेसमोर झाली. संशयित या परिसरात असणार्‍या आईस्क्रीम चालकाकडे गेला व त्याने आईस्क्रीम पार्सल देण्यास सांगितले. चालक पार्सल तयार करत असताना संशयिताने ‘माझा मोबाईल बंद झाला आहे. घरी एक फोन करायचा आहे. तुमचा मोबाईल द्या,’ असे सांगून आईस्क्रीम चालकाकडून त्यांचा मोबाईल घेतला. चालकाचे लक्ष नसल्याचे पाहून मोबाईल चोरुन भामट्याने तेथून पळ काढला.

दुसरी चोरी याच दिवशी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. चोरटा सेव्हन स्टार इमारतीपुढे असणार्‍या ताक विक्री चालकाकडे गेला व त्याने ताक पार्सल करुन देण्यास सांगितले. चोरीची पध्दत तशीच करत मोबाईल मागून घेतला. ताक विक्री चालकाचे लक्ष नसल्याचे पाहून संशयिताने धूम ठोकली. दोन्ही विके्रत्यांची फसवणूक होवून मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठले.
रविवारी चौकीचे फौजदार अमोल वाघमोडे, पोलिस हवालदार किशोर जाधव, बाबासो भिसे, अब्दुल खलिफा, राहूल दळवी यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासामध्ये चोरीचे मोबाईल पाटण जि. सातारा व बेळगाव, कर्नाटक राज्यात असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेवून अटक केली. त्याने ते मोबाईल नातेवाईकांना विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल जप्‍त केले. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर दोन्ही तक्रारदार यांचे मोबाईल परत मिळवून दिले.

सातार्‍यात मोबईल चोरणारी गँग?

सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने फसवणूक करणे, जबदरस्तीने मोबाईल हिसकावणे असे उद्योग वाढले आहेत. व्यवसायिक व महिला या सॉफ्ट टार्गेट होत असल्याचे दाखल तक्रारीवरुन समोर आले आहे. या प्रकरणात एकालाच अटक झाली आहे. मात्र यामागे मोठी गँग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही टोळी बाहेरील जिल्ह्यातील असून सातारकरांनी सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

10 हजाराचे मोबाईल 3 हजाराला…

सातार्‍यातील मोबाईल चोरी प्रकरणात आतापर्यंत दोन मोबाईल जप्‍त झाले आहेत. संशयित चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चोरीचे चांगले मोबाईल अवघ्या 3 ते 5 हजार रुपयांपर्यंत विकल्याचे समोर आले आहे. मोबाईल विकत घेणार्‍यांना पोलिसांनी याप्रकरणात साक्षीदार केले आहे. यामुळे जुना मोबाईल विकत घेताना त्याची पावती असल्याशिवाय मोबाईल घेवू नये, असे आवाहन सातारा शहर पोलिसांनी केले आहे.

Back to top button