सातारा : छोकरी सोबत मिळाली नोकरी! | पुढारी

सातारा : छोकरी सोबत मिळाली नोकरी!

सणबूर;  पुढारी वृत्तसेवा
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे पूत्र यशराज देसाई यांनी एका लग्न सोहळ्यास शुभेच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान देसाई यांनी नवरदेवाला चक्क नोकरीची ऑर्डरच भेट म्हणून दिल्याची सुखद घटना कोयना विभागातील दुर्गम भागातील लेंढोरी या छोट्याशा गावात घडली. दरम्यान मंत्री पुत्रांच्या या अनोख्या भेटीमुळे नवरदेवाला छोकरी बरोबर नोकरी ही मिळाल्याची खुमासदार चर्चा पाटण तालुक्यात सुरू आहे.

कोयना विभागात लेंढोरी हे छोटेसे गाव असून या गावांतील झोरे कुटुंबातील जगन्नाथ झोरे या युवकाने काही दिवसांपूर्वी शिवदौलत सहकारी बँकेच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. वास्तविक शिवदौलत बँक बँकिंग क्षेत्रातील अग्रेसर आणि सातारा जिल्हयातील नावाजलेली बँक आहे. बँकेमध्ये विविध पदांच्या नोकर भरतीकरीता यशराज देसाई यांनी काही दिवसांपूर्वी मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखती दरम्यान जगन्नाथ झोरे याने मुलाखत झाल्यानंतर यशराज देसाई यांना लग्न पत्रिका देऊन लग्न सोहळयास अगत्याने उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. यशराज देसाई यांनी जगन्नाथ झोरेची काम करण्याची प्रामाणिक जिद्द याची दखल घेऊन याबाबत ना. शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केली. त्याची शिवदौलत बँकेमध्ये क्लार्क जागेसाठी निवड केली. आज जगन्नाथ झोरे याच्या लग्न सोहळयाला उपस्थित राहत त्याला वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्याच, या शुभेच्छांसह त्याला शिवदौलत बँकेतील क्लार्क या पदावरील नोकरी बाबतचे नियुक्ती पत्राची अनोखी भेट दिली.

Back to top button