सातारा : जिल्ह्यातील लघु उद्योग आर्थिक संकटात | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील लघु उद्योग आर्थिक संकटात

सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यासह परजिल्ह्यातील मोठ्या उद्योगांवर अवलंबून असणारे लघुउद्योजकांचे आर्थिक कंबरडे सध्या मोडले आहे. एरवी 30 ते 45 दिवसांत मिळणारे पेमेंट तब्बल चार ते सहा महिन्यांनंतर मिळू लागले आहे. एकीकडे मोठ्या कंपन्यांच्या नफ्यात वाढ होत असताना लघुउद्योजकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जिल्ह्यात सातारा, खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण, कराड, वाई व पाटण या औद्योगिक वसाहतीत सुमारे 6 हजाराच्या घरात सूक्ष्म आणि लघुउद्योग आहेत. त्यावर सुमारे 20 हजार लोकांचा रोजगार अवलंबून आहे. व्यवसायासाठी हे लघुउद्योग मोजक्या 80 मोठ्या कंपन्यांवर अवलंबून आहेत. यातील अनेक कंपन्या पूर्ण रक्‍कम देण्याऐवजी 50 ते 60 टक्केच रक्‍कम लघुउद्योजकांना देत आहेत.

मोठ्या कंपन्यांचा व्यवसाय आता स्थिरावला असला तरी, लघुउद्योजक अडचणीत आहेत. त्यातच मोठ्या कंपन्यांची संख्या मर्यादित आहे. परंतु, लघुउद्योजकांची संख्या मोठी आहे. कंपन्यांकडून उशिरा मिळणारा परतावा, हा लघुउद्योजकांसाठी कळीचा मुद्दा ठरला आहे.
कोणतीही वस्तू अथवा माल घेतल्यानंतर मोठ्या उद्योजकांकडून 45 दिवसांचा धनादेश दिला जातो. मात्र, या धनादेशाची मुदत संपण्यापूर्वीच मोठया कंपनीकडून लघु उद्योजकांना या धनादेशाची मुदत वाढवण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे लघु उद्योजकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोठ्या कंपन्यांचे बस्तान व्यवस्थित बसले असताना लघु उद्योजकांना पेमेंट व्यवस्थित करत नसल्याने अनेक लघु उद्योजक हे बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

काही कंपन्या लघुउद्योजकांना त्यांच्या युनिटचा विस्तार करण्यास भाग पाडतात. त्यानंतर काही तरी कारण सांगून अचानक लघुउद्योजकाकडून घेणारा माल कमी केला जातो किंवा बंद केला जातो. त्यामुळे लघुउद्योजक तोंडघशी पडतो असा अनेकांना अनुभव अनेकांना आला आहे. युनिटचा विस्तार करण्यासाठी बहुतेक वेळा कर्ज काढावे लागते. त्याचे हप्ते, कामगारांचे पगार, लाईट बिल, जागेचे भाडे आदींचा भुर्दंड लघुद्योजकांवर पडतो. लघु उद्योजकांचा संपूर्ण व्यवसायच कंपन्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो, अशी अनेक लघुउद्योजकांची अवस्था झाली आहे. बँकांचे हप्ते थकले तर, त्यावर लगेच व्याज आकारले जाते. परंतु, आमचे पैसे अडकले तर, व्याज मिळत नाही. त्यातून अनिश्‍चितेचे वातावरण निर्माण होत आहे.

पुण्या, मुंबईतील कंपन्यांशी संधान साधणे गरजेचे

सिातारा जिल्ह्यात असणारे लघु उद्योजकांनी केवळ सातार्‍यातील मोठया कंपन्यांवर निर्भर न राहता अन्य वाटा चोखाळणे गरजेचे झाले आहे. सातार्‍यालगत असणार्‍या कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई येथील औद्योगिक वसाहतीत त्यांच्या संबंधित असणार्‍या कंपन्यांशी संधान साधल्यास लघु उद्योजकांची भरभराट होणार आहे. यासाठी त्या-त्या घटकातील लघु उद्योजकांनी एकत्र येत पुण्या, मुंबईतील औद्योगिक वसाहतींना भेटी देवून पाहणी करणे गरजेचे आहे. यामुळे लघु उद्योजकांची आर्थिक अडचण दूर होवून ते स्वत:च्या पायावर उभे राहतील. तसेच स्पर्धा वाढल्याने सध्या होणारी पिळवणूकही थांबेल.

Back to top button