सातारा : नारळफोड्यांना सातारकर नागरिक निरोपाचा नारळ देतील : आ. शिवेंद्रराजे | पुढारी

सातारा : नारळफोड्यांना सातारकर नागरिक निरोपाचा नारळ देतील : आ. शिवेंद्रराजे

सातारा : पुढारी वृत्तसेवा
गेली पाच वर्षे टक्केवारी, कमिशन, टेंडर आणि घंटागाड्यांचे हप्‍ते असा एककलमी कार्यक्रम राबवून सत्ताधार्‍यांनी पालिकेची अक्षरशः लूट केली. तीन-चार महिन्यांपूर्वी पालिकेची निवडणूक लागणार, असे दिसताच सत्ताधार्‍यांनी शहरात नारळ फोडण्याचा धडाका लावला पण, निवडणूक पुढे ढकलल्याचे जाहीर होताच सत्ताधारी आघाडीचे नेते नेहमीप्रमाणे गायब झाले. आता पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि सातार्‍यातील नारळफोड्या गँग पुन्हा सक्रिय झाली. मात्र, सुज्ञ सातारकर नागरिक निरोपाचा नारळ देऊन गँगला घरी बसवतील, असा टोला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला आहे.

आ. शिवेंद्रराजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून, सातारकरांना भावनिक करून सातारा विकास आघाडीने पालिकेची सत्ता मिळवली. भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या घोषणा करणार्‍यानीच पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले. स्वार्थी आणि सत्तांध सत्ताधार्‍यांची कमाल म्हणजे निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलल्याचे जाहीर होताच हे नेहमीसारखे गायब झाले आणि आता निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याचे जाहीर करताच हे पुन्हा हजर झाले आणि नारळफोड्या गँग पुन्हा सक्रिय झाली.

नगरपालिकेचा कारभार कोण चालवतंय, पालिका प्रशासन, मुख्याधिकारी चालवतात का निवडणूक आयोग चालवतंय, हेच सातारकरांना कळायला मार्ग नाही. कास धरणाच्या प्रकल्पामुळे पाचपट पाणीसाठा होणार आहे पण, त्याचा फायदा सातारकरांना होणार नाही. पाणीसाठ्याच्या क्षमतेनुसार नवीन जलवाहिन्या टाकल्या असत्या तरच सातारकरांना मुबलक पाणी मिळाले असते. पण, सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणा आणि दुर्लक्षामुळे सातारकरांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. ही पाणी टंचाई नैसर्गिक नसून पालिकेने लादलेली पाणीटंचाई आहे. सत्ताधारी आघाडीचा कारभार आता जनतेला चांगला कळला आहे. त्यामुळे सातारकर त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही आ. शिवेंद्रराजे यांनी दिला आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button