अजितदादा पवार : ‘किसनवीर’च्या सहकार्यासाठी तयारीला लागा | पुढारी

अजितदादा पवार : ‘किसनवीर’च्या सहकार्यासाठी तयारीला लागा

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : किसनवीर सहकारी साखर कारखान्यावर कर्जाचा मोठा बोजा आहे. किसनवीरसंबधित कर्जाची कागदपत्रे, करार यांसह अन्य कागदपत्रे गोळा करावीत. घाईघाईत ही बैठक आयोजित केल्याने अधिकार्‍यांना कागदपत्रांची जुळणी करता आलेली नाही. मात्र, किसनवीर चालू करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लागणार असून, त्यासाठी तयारीला लागा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सहकार विभाग व राज्य सहकारी बँकेच्या अधिकार्‍यांना केल्या. दरम्यान, याबाबत पुन्हा सोमवारी सातार्‍यात चर्चा होणार आहे.

किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांनी कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ना. पवार हे सातारा दौर्‍यावर आले असता किसनवीरचा विषय मकरंदआबा व नितीनकाकांनी त्यांच्या कानी घातला होता. राज्य सहकारी बँक व सरकारकडून मदत करण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती. त्यावर किसनवीर कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी लवकरच अ‍ॅक्शन प्लॅन केला जाईल, असे अजितदादांनी सातारा दौर्‍यात सांगितले होते. त्या अनुषंगाने मंत्रालयात शुक्रवारी बैठक झाली.

या बैठकीस आ. मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर, सहकार विभागाचे सचिव गुप्ता, प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे, सातारा जिल्हा विशेष लेखा परीक्षक (साखर) डी. एन. पवार, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सहकार विभागाकडून किसनवीर कारखान्यावर असणार्‍या कर्जाचा आढावा घेण्यात आला. तसेच किसनवीर कारखान्याने प्रतापगड आणि खंडाळा कारखान्याशी केलेल्या कराराचे स्वरूप काय आहे याचाही आढावा घेण्यात आला. कर्जांसह शेतकर्‍यांची व कर्मचार्‍यांची देणी याचीही माहिती घेण्यात आली. यावेळी अधिकार्‍यांकडे कागदपत्रे नसल्याने मोघम माहिती देण्यात आली. त्यावर अजितदादांनी किसनवीरसंदर्भात सर्व कागदपत्रांची जुळणी करण्याचे आदेश दिले.

सोमवारी ना. अजितदादा पवार सातारा जिल्हा दौर्‍यावर आहेत. यावेळी किसनवीरबाबत ना. अजितदादा पवार, सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, नितीनकाका पाटील यांची बैठक होणार आहे. या बैठकीला कागदपत्रांसह हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी विद्याधर अनासकर यांना अजितदादांनी किसनवीरला आपल्याला सहकार्य करायचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करा. कागदपत्रे आल्यानंतर सविस्तर असा प्लॅन करायचा आहे. यासाठी तयारीला लागा, अशा सूचना केल्या.

साखर विभागाचे जिल्हा विशेष लेखा परिक्षक डी. एन. पवार यांच्याकडून कारखान्यासंदर्भातील सर्व माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडूनही या गोष्टीचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे किसनवीरबाबत लवकरच ठोस धोरण तयार होण्याची दाट शक्यता आहे.

Back to top button