सातारा : जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांची साखरपेरण | पुढारी

सातारा : जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांची साखरपेरण

सातारा : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित करणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मोकळा झाला आहे. नव्या गट- गण रचनेनुसार या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी गट व गणाचे मागील काही वर्षांचे आरक्षण गृहीत धरून लोकांच्या भेटीगाठींवर भर देत साखर पेरणी
सुरू केली आहे. त्यातून निवडणुकीपूर्वीच मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची वातावरण निर्मिती सुरू झाली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांनी सारा ग्रामीण भाग ढवळून निघतो. अलीकडे तरुणांचाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे ओढा वाढला आहे. ग्रामीण भागातील नेतृत्व सिद्ध करण्याची जिल्हा परिषद व पंचायत समितींची निवडणूक हे एक साधन तरुणांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे निवडणुकीत आपल्याला संधी मिळाल्यास आपलाच पत्ता कसा ओपन होईल, यासाठी अनेक जण धडपडताना दिसत आहेत.

विद्यमान जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची मुदत फेब्रुवारी 2022 मध्ये संपली आहे. त्यामुळे तेथील कारभार प्रशासकाकडून चालवला जात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीचा प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
यामध्ये नगरपालिकेतील समाविष्ट भाग वगळता 9 गट आणि 18 गण वाढणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 73, तर पंचायत समिती सदस्यांची संख्या 146 होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात 10 मार्च 2022 रोजीच्या स्थितीनुसारच या निवडणुका घ्यावेत, असे म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसारच होणार हे स्पष्ट झाले आहे.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन इच्छुकांनी आतापासूनच गट- गणांत संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. गावोगावी विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटनांसह प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांसह इच्छुक उमेदवारांकडून कार्यवाही सुरू आहे. गावोगावी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटीगाठींवरही इच्छुकांनी भर दिला आहे. कोणत्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये कोणते आरक्षण पडणार? याबाबतचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
असे असले तरीही मागील निवडणुकांवेळी संबंधित गटात कोणते आरक्षण होते, याचा विचार करून आगामी आरक्षणाचे आराखडे बांधून इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे गावोगावी मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची वातावरण निर्मिती सुरू झाली आहे.

गावांच्या विभागणीने अनेकांना धास्ती

जिल्ह्यात 9 गट व 18 गण वाढणार आहे. त्यामुळे सध्याच्या असणार्‍या गटांमधील गावे इकडची-तिकडे होणार आहे. त्याची धास्ती अनेकांनी घेतली आहे. सहा तालुक्यांमधील गटांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे या तालुक्यांमधील इच्छुकांमध्ये कोणते गट निर्माण होणार व कोणत्या गावांची विभागणी होणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे. या गटांची आरक्षण सोडत कशी होणार? त्या गावातील जनसंपर्क या बाबींवर इच्छुकांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

Back to top button