वाई : युवकांनी पुकारला पाण्यासाठी एल्गार | पुढारी

वाई : युवकांनी पुकारला पाण्यासाठी एल्गार

वाई; पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जाणार्‍या गुंडेवाडी गावातील युवकांनी एकत्र येऊन पाण्यासाठी एल्गार पुकारला आहे. शासनाच्या मदतीची वाट न पाहता ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वखर्चातून मोकळ्या जागांवर, डोंगर उतारांवर शेकडो खड्डे, छोटे बंधारे, पाझर तलावांची दुरूस्ती आदी कामे हाती घेतली आहेत.

केवळ देखावा म्हणून सामाजिक काम न करता गावाची पाणी टंचाई कायमची संपावी, यासाठी युवकांनी व ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव डोंगराच्या पायथ्याला व पांडवगडाच्या उत्तरेला डोंगर उतारावर गुंडेवाडी गाव वसले आहे. या गावांत दरवर्षी एप्रिल व मे महिन्यांत पाणीटंचाई ठरलेली आहे. पावसाळ्यात मुबलक पाऊस पडून सर्व पाणी ओढ्या-नाल्यांव्दारे वाहून जात आहे. ओढ्याला बंधारे घातले तरी अति पावसामुळे ते वाहून जातात व उन्हाळ्यात पाण्याच्या एका हंड्यासाठी ग्रामस्थ महिलांना सारे शिवार पालथे घालावे लागते. गुरांच्या पाण्यासाठी प्रसंगी दोन किलोमीटरवरील धावडी – पिराचीवाडीतील पाझर तलावाकडे जावे लागते.

पाण्याची नेमकी गरज ओळखून व वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी, साठवण्यासाठी गुंडेवाडी- पेटकरवस्तीतील दहा- पंधरा युवकांनी प्रत्येकी हजार-पाचशे स्वइच्छेने वर्गणी काढून गुंडेवाडीच्या परिसरांतील डोंगर द-यामध्ये, मोकळ्या जागेत जवळपास 30-35 मोठे खड्डे, काही चर, जुना बंधारा दुरूस्ती, मध्यम बंधारा अशी कामे संजय पेटकर, मोहन पेटकर व काही ठिकाणी सामाईक असलेल्या जागेंमध्ये करण्यात आली आहेत. त्यामध्ये हजारो- लाखो लिटर पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे परिसरातील जमिनीमध्ये पाणी पाझरण्याचे प्रमाण वाढणार असून गावातील पाण्याचे स्त्रोत बारमाही सुरू राहण्यासाठी युवकांची ही धडपड आहे. दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा युवकांचा मानस आहे.

या उपक्रमामध्ये सुमीत पेटकर, राजेंद्र पेटकर, सचिन पेटकर, संतोष पेटकर, भगवान पेटकर, राहूल पेटकर, उपसरपंच सर्जेराव कोंडके, संजय पेटकर, सौरभ पेटकर, अंकुश पवार, सुरेश पेटकर, अक्षय पेटकर आदींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. नथू पेटकर, सरपंच शशिकांत मांढरे, अशोक नवघणे आदींनी मदत केली. अशोक राठोड यांनी योग्य नियोजन केले.

Back to top button