सातारा : झेडपी, पंचायत समितीचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर | पुढारी

सातारा : झेडपी, पंचायत समितीचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा परिषद व 11 पंचायत समित्यांच्या प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. नवीन प्रभागरचनेनुसार सातारा जिल्हा परिषदेमध्ये नव्याने 9 गट व 18 पंचायत समिती गणांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी एकूण 73 सदस्य होणार असून पंचायत समित्यांमध्ये 146 सदस्यांची नियुक्ती होणार आहे.

मार्च 2022 मध्ये मुदत संपणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकार्‍यांना दिले होते.त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने लोकसंख्यानिहाय जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता. याचा आराखडा जिल्हाधिकार्‍यांकडून आयोगाला सादर केल्यानंतर यावर अखेर शिक्कामोर्तब झाले.

नव्याने प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा हा 2011 च्या जनगणनेनुसार तयार करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकार्‍यांकडून याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करावा.आयुक्तांनी यावर मुदतीमध्ये मान्यता द्यावी. आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी यावर हरकती सूचना मागवाव्यात. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी घ्यावी. सुनावणीनंतर आयुक्तांनी प्रभाग रचनेस अंतिम मान्यता द्यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.

निवडणूक आयुक्तांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या आता 73 होणार आहे. पूर्वी जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 64 होती. त्यामध्ये वाई 1, फलटण 2, खटाव 2, कोरेगाव 1, कराड 2 व पाटण 1 अशा 9 गटांची नव्याने वाढ झाली आहे. त्यामुळे या तालुक्यात पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढली आहे.

प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी दि. 23 मे पर्यंत विभागीय आयुक्तांकडे सादर करावेत. दि. 31 मे पर्यंत विभागीय आयुक्तांनी त्याला मान्यता द्यावी. दि. 2 जूनपर्यंत जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतची आधिसूचना प्रसिध्द करावी. अधिसूचना प्रसिध्द झाल्यानंतर दि. 2 ते 8 जून या कालावधीत हरकती, सूचना व सुनावणी होणार आहेत. दि. 22 जूनपर्यंत प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार आहे. दि. 27 जून रोजी याबाबत अधिसूचना काढण्यात येणार आहे.

आरक्षण सोडत नंतर होणार जाहीर

प्रभाग रचना व आरक्षण सोडत झाल्यानंतर महाबळेश्वर तालुक्यातील 2 गट व 4 गण, वाई तालुक्यातील 5 गट व 10 गण, जावली तालुक्यातील 3 गट व 6 गण, फलटण तालुक्यातील 9 गट व 18 गण,माण तालुक्यातील 5 गट व 10 गण, खटाव तालुक्यातील 8 गट व 16 गण, कोरेगाव तालुक्यातील 6 गट व 12 गण, सातारा तालुक्यातील 10 गट व 20 गण, खंडाळा तालुक्यातील 3 गट व 6 गण, पाटण तालुक्यातील 8 गट व 16 गण, कराड तालुक्यातील 14 गट व 28 गणांसाठी धूमशान होणार असून जिल्ह्यातील सहा तालुक्यांत गट व गणांची संख्या वाढली आहे. या गट व गणांच्या अधिकृत निश्चितीनंतर आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

Back to top button