सातारा : पुढारी वृत्तसेवा
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ असा जयघोष, डीजेचा दणदणाट अन् थरथराट, ढोल-ताशांचा निनाद, गुलाल, फुलांची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीत सातार्यासह जिल्ह्यात सार्वजनिक व घरगुती बाप्पांना निरोप देण्यात आला. सातारा शहरात तब्बल 18 तास सुरू असलेल्या मिरवणुकीची बुधवारी सकाळी 10 वाजता सांगता झाली. मानाच्या शंकर-पार्वती गणपतीचे बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्यात विसर्जन झाल्यानंतर मिरवणूक संपली. दरम्यान, जिल्ह्यातील 3 हजार 723 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये सातारा शहरातील 176 मूर्तींचा समावेश होता.
जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 7 हजार घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन
विसर्जन मिरवणुकीत गुलालाची उधळण
कर्णकर्कश आवाजाच्या दणदणाटात काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती
गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची मंगळवारी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सातारा शहरात मुख्य विसर्जन मिरवणुकीस मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास सुरुवात झाली. आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखी, ट्रॅक्टरवरुन मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी येत होत्या. मोती चौकात विविध गणेश मंडळे मिरवणुकीमध्ये सामील झाली. शहरातील महागणपती सम्राट, पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्ट, व्यापारी गणेशोत्सव मंडळ, सातारचा उभा महाराजा, सातारचा महाराजा, केसरकर पेठेचा राजा, बोगद्याचा राजा आदि गणेश मूर्तींसमोर रांगोळीचा सडा टाकण्यात येत होता.
मिरवणुकीत गणेश भक्त व युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रात्री 6 नंतर कर्णकर्कश आवाजाची डीजे सिस्टिम लावलेल्या मंडळांना आणखी जोर आला. ज्या मंडळांनी कर्णकर्कश आवाजाची डीजे सिस्टिम लावली होती त्यांनी डोळे दिपवणारा लाईट शोही केला. हा शो गणेश मूर्तींसह नागरिकांवरही टाकण्यात आला. कर्णकर्कश आवाजाच्या सिस्टिमने डेसिबलची मर्यादा ओलांडल्याने नागरिकांना अक्षरश: कानात बोळे घालून तसेच कानावर हात ठेवून पुढे जावे लागले. डीजेमुळे अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. या मिरवणुकीत पोलिसांची ढिलाई दिसून आली. विसर्जन मिरवणुकीत गुलालाची उधळण केल्याने शहरातील रस्ते गुलालाने माखले होते. रात्री उशीरापर्यंत विद्युत रोषणाई केलेली मंडळे मिरवणुकीत दाखल झाली.
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. राजपथावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांनी गणेश मंडळांचे स्वागत केले. त्यामुळे मिरवणुकीचा रंग वाढला. रात्री उशिरापर्यंत बाराच्या ठोक्यापर्यंत दणदणाट सुरुच होता. त्यातच डोळे दिपवणारा लाईट शो नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. डीजेमुळे सर्वच मंडळांसमोर युवक वर्ग नाचण्यात दंग झालेला दिसत होता. त्यामुळेच खालचा रस्ता आणि राजपथावर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. त्यातच अधून-मधून फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात येत होती.
कर्णकर्कश आवाजाच्या दणदणाटात काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. ढोल-ताशा पाहण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, या पूर्ण मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजामुळे पारंपरिक वाद्यांचा आवाज पूर्णपणे विरल्याचे दिसून आले. रात्री 11 वाजता पोलिस अधीक्षक समीर शेख, राजीव नवले यांनी राजपथावर मिरवणुकीची पाहणी केली. तर पोलिस दलाच्यावतीने साध्या वेशातील पोलिस तसेच रॅपिड अॅक्शन फोर्सचे कर्मचारी गस्त घालताना दिसत होते. रात्री 12 च्या ठोक्याला पोलिसांनी कर्णकर्कश आवाजाची सिस्टिम व पारंपरिक वाद्ये बंद करण्याच्या सूचना मंडळांना दिल्या. त्यामुळे मध्यरात्री दणदणाट बंद झाला होता. कर्णकर्कश आवाजाची सिस्टिम बंद झाल्यानंतर शहरातील गर्दी हळूहळू ओसरु लागली. तसेच अनेक मंडळांची वाहने बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याकडे मार्गस्थ होण्यास सुरुवात झाली. या कृत्रिम तळ्यावर भल्या मोठ्या क्रेनच्या सहाय्याने सार्वजनिक गणेश मंडळांच्या मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. बुधवारी सकाळी 10 वाजता शनिवार पेठेतील मानाच्या शंकर-पार्वती गणेश मूर्ती विसर्जनाने मिरवणुकीची सांगता झाली.
राजपथावर खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या स्वागत कक्षासह सकल मराठा समाजाच्यावतीनेही स्वागत कक्ष तयार करण्यात आला होता. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या स्वागत कक्षात भाजपचे सातारा शहरातील पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. तर सकल मराठा समाजाच्या स्वागत कक्षात सर्वच पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवकांसह दोन्ही राजेंचे कार्यकर्तेही हजेरी लावत होते.
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 7 हजार घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नगरपालिकेने नियोजित केलेल्या विसर्जन कृत्रिम तलावात तसेच राजवाडा परिसरातील नगरपालिकेच्या पोहण्याच्या तलावात विसर्जन करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. पालिकेच्या कृत्रिम हौद, तसेच बुधवार नाका, राजवाड्यावरील पोहण्याचा तलाव, सदरबझार, हुतात्मा उद्यान, गोडोली, संगम माहुली, वर्ये येथील तसेच वाढे फाटा परिसरात वेण्णा नदीवर गणेश भक्तांनी विसर्जनासाठी गर्दी केली होती. ग्रामीण भागातील विहिरी, तलाव, तळ्यांवर घरगुती तसेच सार्वजनिक गणेश विसर्जन करण्यात आले.