सातारा : जिल्ह्यातील 8 पालिकांच्या लवकरच निवडणुका | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील 8 पालिकांच्या लवकरच निवडणुका

सातारा : पुढारी वृत्तसेवा

राज्यात एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला. सातारा, फलटण, कराड, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, म्हसवड या आठ नगरपालिकांचा त्यामध्ये समावेश आहे. या नगरपालिकांच्या निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमामध्ये सुधारणा केल्यानंतर प्रभाग रचना राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने राज्य शासनाने करण्याची तरतूद करण्यात आली. त्यानुसार प्रभाग रचना कार्यक्रमाबाबत पुढील कार्यवाही अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार राज्य शासनाच्या निर्देशानुसार करण्यात यावी, असे आयोगाने संबंधित जिल्हाधिकार्‍यांना कळवले होते. 2022 च्या महाराष्ट्र अधिनियमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने 4 रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने उपरोक्त सुधारणा अधिनियम अस्तित्वात आल्यानंतर स्थगित केलेल्या टप्प्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कार्यवाही पुढे सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सार्वत्रिक निवडणुकांकरता प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाबाबत आदेश देण्यात आले आहेत. प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकतींच्या टप्प्यापासूनच्या सुधारित कार्यक्रमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रभाग रचना अंतिम करण्याबाबत यापूर्वीचे संबंधित आदेश अधिक्रमित करुन राज्य निवडणूक आयुक्त यांनी त्यांचे अधिकारी संबंधित मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना प्रदान केले आहेत. नगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारुप अधिसुचना 10 मार्चला प्रसिध्द करण्यात आली होती. प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या आक्षेप व हरकतींसह सुधारित कार्यक्रमानुसार नव्याने प्राप्त होणार्‍या आक्षेप व हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे. वेळापत्रकानुसार प्रत्येक टप्प्पा वेळेवर व योग्य रितीने पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांची आहे. त्यानुसार त्यांनी योग्य ती सर्व उपाययोजना करायची आहे.

नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरता आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम यथावकाश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नगरपरिषदांबाबत प्रभाग रचना करण्यास बाधा येणारी कोणतीही बाब आयोगास तात्काळ अवगत करावी लागणार आहे. प्रत्येक टप्प्यावरील अहवाल राज्य निवडणूक आयोगास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘अ’ वर्ग असलेली सातारा आणि ‘ब’ वर्ग असलेली फलटण आणि कराड या नगरपालिकाच्या अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोग मंजुरी देणार आहे तर, ‘क’वर्ग असलेल्या वाई, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर या नगरपालिकांच्या प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त मंजुरी देणार आहेत. सुचना व हरकतींवर जिल्हाधिकारी सुनावणी घेवून त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवणार आहेत.

असा आहे प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम

प्रारूप प्रभाग रचना टप्पा व  दिनांक-
  • हरकती व सूचना मागवणे – दि. 10 ते 14 मे पर्यंत
  • हरकती व सूचनांवर सुनावणी  –  दि. 23 पर्यंत
  • अहवाल आयोगाला पाठवणे  –  दि. 30 पर्यंत
  • अंतिम प्रभाग रचेनस मान्यता देणे  –  दि. 6 जूनपर्यंत

Back to top button