वाई : लक्ष्मणराव पाटलांच्या मुलांनीच तुम्हाला जमिनीत गाडले | पुढारी

वाई : लक्ष्मणराव पाटलांच्या मुलांनीच तुम्हाला जमिनीत गाडले

वाई; पुढारी वृत्तसेवा : 19 वर्षापूर्वी सोनगिरवाडीत ‘त्यांनी’ केलेले विधान हे आमच्या लक्षात होते. ते म्हणाले होते लक्ष्मणराव पाटील यांच्या चार पिढ्या आल्या तरी कारखान्याच्या जवळपास फिरकू देणार नाही. मात्र, लक्ष्मणतात्यांच्या या दोन्ही मुलांनीच तुम्हाला जमिनीत गाडायचे काम केले आहे. सर्व सभासदांनी तुम्हाला कारखान्याच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण नेस्तनाबूत करण्याचा निर्णय केला आहे, असा हल्लाबोल आ. मकरंद पाटील यांनी कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले यांच्यावर केला.

किसनवीर कारखान्याच्या निकालानंतर दै. ‘पुढारी’ने विजयाचे शिल्पकार आ. मकरंद पाटील आणि नितीनकाका पाटील यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मदनदादा भोसले यांचा समाचार घेतला. यावेळी तुम्हाला इतक्या मोठ्या फरकाने हा विजय मिळेल, अशी खात्री होती का? असे विचारले असता आ. मकरंद पाटील म्हणाले, आमच्या पॅनेलच्या उमेदवारांना तब्बल साडे नऊ हजार मताधिक्क्याने कारखान्याच्या सभासदांनी निवडून दिले. विद्यमान संचालकांमुळे भरडलेला शेतकरी आणि स्व. लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांना हा विजय मी अर्पित करत आहे. 20 ते 21 महिने शेतातच पडून राहिलेला ऊस, रखडलेली एफआरपी, कामगारांची थकलेली देणी यामुळे शेतकरी व कामगारांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये रोष होता. त्यामुळे इतक्या मोठया फरकाने विजय मिळेल याची खात्री होती. तीन कारखान्यांचे मिळून एक हजार कोटींचे कर्ज आणि देणी द्यायची होती. त्यामुळे आम्हाला खात्री होती की शेतकरी सभासद हा आमच्या बाजूने फार मोठा कौल देणार आहे.

कारखान्याची निवडणुक जिंकल्यानंतर सभासद शेतकर्‍यांना दिलेली आश्वासने आपण कशी पूर्ण करणार आहात? असे विचारले असता आ. पाटील म्हणाले, कारखान्याच्या माध्यमातून सर्व सभासदांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. बंद कारखाना सुरू करणे आमच्यासाठी मोठे आव्हान आहे. कर्जाचा प्रचंड डोंगर या मंडळींनी करुन ठेवला आहे त्याचे ही आव्हान फार मोठे आहे. शेतकर्‍यांची थकलेली एफआरपी, कामगारांची न दिलेली देणी देण्यासाठी आम्हाला आगामी काळात कष्ट करावे लागणार आहे. सभासदांनी निवडून दिलेले आम्ही कोणीही यामध्ये कमी पडणार नाही. स्व. लक्ष्मणराव पाटील तात्यांचीच मुले आम्ही आहोत आणि त्यांची जी शिकवण आहे त्या शिकवणीला अनुसरुनच सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न करु.

या निवडणुकीतील तुमचा सार्वत्रिक अनुभव काय होता? आणि या निवडणुकीतून तुम्ही पुढे कशी वाटचाल करणार आहात? असे विचारले असता नितीनकाका पाटील म्हणाले, सभासदांचा आणि शेतकर्‍यांचा फार मोठा उठाव पाचही तालुक्यामध्ये होता. त्या उठावाचे रुपांतर हे मताच्या रुपाने आपणाला दिसले आहे. या कारखान्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, कारखान्यावर प्रचंड कर्ज झाले. त्याचा प्रचंड रांग जनतेच्या मनामध्ये होता. किंबहुणा हा कारखाना दिवाळखोरीत काढण्याचे काम विद्यमान चेअरमन आणि त्यांच्या संचालकांनी केले. त्या सगळ्यांना जनतेने धडा शिकवला आहे.

खा. शरद पवार, ना. अजितदादा, ना. रामराजे ना. निंबाळकर, पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे व जिल्ह्यातील सर्व नेते मंडळींच्या मदतीने कारखान्यांच्या अडचणींतून तरुन जावू. जिल्हा मध्यवर्ती बँक या कारखान्याला योग्य पद्धतीने मदत करेल. भाग भांडवलासाठी 50 कोटी, 100 कोटी रुपये जरी लागले तरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आम्ही सर्व संचालक निश्चितपणाने या कारखान्याच्या सभासदांना मदत करु. येणार्‍या दोन-तीन महिन्यातच हे भागभांडवल उभे करावे लागणार आहे. तरच येणारा गळीत हंगाम चालू करण्यासाठी प्रयत्न करता येतील, असेही नितीनकाका म्हणाले.

निवडणुकीपूर्वी ‘पुढारी’ने घेतलेली भूमिका योग्यच होती

निवडणुकीपूर्वी ‘पुढारी’ने कारखाना कार्यक्षेत्रातील शिल्लक उसाबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी आपल्या विरोधातही ‘पुढारी’ने आवाज उठवला होता. तुमच्या काही लोकांना त्यावेळी खटकलेही होते. आता विजयानंतर ‘पुढारी’च्या त्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे? असा थेट प्रश्न आ. मकरंद पाटील यांना विचारला असता ते म्हणाले,दै. ‘पुढारी’ने सर्व सामान्य शेतकर्‍याची भूमिका मांडली होती. त्यामध्ये शेतकरी, कामगार यांचे झालेले हाल ‘पुढारी’ने मांडले होते. दै. ‘पुढारी’ची ती भूमिका योग्यच होती. त्याबद्दल आभार मानतो. त्यावेळीही मी ते खिलाडूवृत्तीने स्वीकारले होते. कारण जो शेतकरी या कारखान्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे भरडला गेला तेच सत्य दै. पुढारीने मांडले होते. आम्ही सुद्धा या गोष्टीचाच विचार करुन कारखान्याच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आणि आज झालेला निकाल सर्वांच्या समोर आहे. नुसता विजय मिळाला म्हणजे सर्व झाले असे नाही. आजचा विजय खर्‍या अर्थाने सभासदांनी आमच्यावर टाकलेली जबाबदारी आहे. या जबाबदारीचे भान निश्चितपणाने मला आणि माझ्या सहकार्‍यांना आहे, असेही आ. मकरंद पाटील म्हणाले.

Back to top button