वाई नगराध्यक्षा अपात्र; भाजपला धक्का, राष्ट्रवादीच्या गोटात आनंद | पुढारी

वाई नगराध्यक्षा अपात्र; भाजपला धक्का, राष्ट्रवादीच्या गोटात आनंद

सातारा; पुढारी वृत्तसेवा : वाई नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे अपात्र ठरल्‍या आहेत. त्‍यांच्‍यावर राज्य शासनाने अपत्रातेची कारवाई केली आहे. सन २०१७ मध्ये ठेकेदाराकडून लाच घेताना वाई नगराध्यक्षाआणि त्यांच्या पतीला अटक झाली होती. त्यानंतर वेळोवेळी याबाबत सुनावणी झाली. त्यातून शासनाने नगराध्यक्षा डॉ. शिंदे यांना पदावरुन बाजूला केल्याचा निर्णय दिला.

नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी भारतीय जनता पक्षातून थेट नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक लढविली होती. त्या निवडून आल्यानंतर वाईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटास धक्का बसला होता.

त्यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईनंतर आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात आनंदाचे वातावरण आहे.

डॉ. प्रतिभा शिंदे यांनी एका कामाच्या मोबदल्यात ठेकेदारास १४  हजार रुपयांची लाच मगितल्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेनंतर त्यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला हाेता.

दरम्यानच्या काळात पालिकेतील नगरसेवकांनी त्यांना पदावरुन बाजूला करा, अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती.

त्यानूसार दोन वेळा सुनावणी झाली. शासनाने डॉ. शिंदे यांना नगराध्यक्षपदावरुन हटविण्याचा निर्णय दिला. या निर्णयाने सातारा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान डॉ. प्रतिभा शिंदे यांना या पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही असेही शासनाने दिलेल्या निर्णयात नमूद केले आहे.

Back to top button