कराड : मलकापूरात उड्डाणपुलाखाली रोपे वाळली | पुढारी

कराड : मलकापूरात उड्डाणपुलाखाली रोपे वाळली

कराड : पुढारी वृत्तसेवा

मलकापूर शहरात सर्वत्र स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सुशोभिकरण करण्यात आले आहे. नगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांची स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये पाहिल्या 5 मध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र शिवछावा चौकात (ढेबेवाडी चौकात) उड्डाणपूलाखाली लावलेल्या झाडांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे रोपे गायब झाली आहेत. मातीसह टायरचे सांगाडे शिल्लक राहिल्याने व दारूच्या बाटल्या टाकल्या जात असल्याने ही जागा अडगळीची बनली आहे.

यावर्षी मलकापूर नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या अनुषंगाने जोरात तयारी केली आहे. काही महिन्यांपुर्वी पालिकेने टाकाऊ पासून टिकाऊ मोहिम राबवित उड्डाणपूलाखाली व चौकाचौकात सुशोभिकरण केले होते. विविध कार्यक्रमातून जनजागृती केली जात आहे. नागरिकही त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत. शासनाच्या आदेशानुसार मलकापूर पालिकेमार्फत प्लास्टिक बंदी, श्रमदान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्रबोधनपर कार्यक्रमांद्वारे जनजागृती करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत.

उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्यासह नगरसेवक तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांनी शहरात प्रबोधन व सुशोभिकरणावर भर दिला होता. स्वच्छता ही केवळ नगरपालिकेची जबाबदारी नसून ती सार्वजनिक जबाबदारी असल्याची माहिती देत पहिल्या 5 मध्ये येण्याचा निर्धार केला आहे. महामार्गाच्या उड्डाणपूलाखाली ढेबेवाडी चौकात टाकाऊपासून टिकाऊ या उद्देशाने टायरमध्ये माती टाकून झाडे लावून सुशोभिकरण केले होते. सुरवातीलाच काही विघ्नसंतोषी लोकांनी यातील काही झाडांची चोरी केली तर काही झाडांची नासधुस केली होती. यावर नगरपालिका प्रशासनाने संबंधित अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र काही महिन्यातच या सुशोभिकरणाकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे एक-एक करत येथे लावलेली बहुतांशी रोपे जळून गेली असून केवळ मातीसह टायरचा सांगाडे राहिले आहेत.

Back to top button