सातारा जिल्ह्यातील धरणांत 40 टक्केच पाणी | पुढारी

सातारा जिल्ह्यातील धरणांत 40 टक्केच पाणी

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम पाणी प्रकल्पांमधील पाणीसाठा प्रचंड प्रमाणात खालावून तो 40 टक्क्यांवर आला आहे. धरणांमध्ये 58.92 टीएमसी पाणी असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत या पाणीसाठ्यात सुमारे 7.98 टीएमसीने घट झाली आहे. बर्‍याच धरणांनी तळ गाठल्यानेे शेती आणि पिण्याच्या पाण्याचे पाटबंधारे विभागाने यावर्षी केलेले नियोजन पूर्णत: कोलमडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात जवळपास 15 मोठे व मध्यम प्रकल्प असून त्याची पाणी साठवण क्षमता 145.29 इतकी आहे. या धरणांमध्ये गेल्यावर्षी याच महिन्यात 66.90 टीएमसी (46.92 टक्के) पाणी होते. सध्या हा पाणीसाठा 58.92 टीमसी (40.56 टक्के) असून गेल्यावर्षीच्या तुलनेत 7.98 टीएमसी इतका कमी आहे. गेल्या सात-आठ महिन्यांत 86.37 टीमएसी इतक्या प्रचंड पाण्याचा वापर

वीजनिर्मिती, शेती, उद्योगधंदे यासाठी झाला. त्यासाठी घरगुती कारणासाठी व पिण्यासाठी पाणीवापर खूप कमी आहे. 105 टीएमसी पाणीसाठा असलेल्या कोयना धरणात 36.17 उपयुक्‍त पाणीसाठा असून गेल्यावर्षीच्या तुलनेत तो 5 टीएमसीने कमी आहे. धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, निरा-देवघर, वीर, मोरणा-गुरेघर, उत्‍तरमांड, नागेवाडी, कुडाळी-हातगेघर या पाणीप्रकल्पांमध्ये 40 ते 50 टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे.

उरमोडी, तारळी, भाटघर, येरळवाडी, कुडाळी-महू या धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असले तरी या धरणांची पाणी साठवण क्षमता इतर धरणांमध्ये कमी आहे. तीव्र उन्हाळा असल्यामुळे याही धरणांतील पाणीपातळी स्थिर राहिल हे निश्‍चित सांगता येणार नाही. शिवाय धोम, कण्हेर आणि उरमोडी धरणांतील 0.50 टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. धोम डावा व उजव्या कालव्यातून वाई, कोरेगाव, सातारा, कराड व जावली तालुक्यासाठी मे आणि जून महिन्यांत आवर्तने दिली जाणार आहेत.

कण्हेर उजवा व डावा कालव्यातून सातारा, कोरेगाव व कराड तालुक्यांना तर उरमोडी व तारळी प्रकल्पातून सातारा, माण व खटाव तालुक्यासाठी मे आणि जून महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे. स्थानिक व ग्रामीण पाणीपुरवठा योजना या त्या-त्या त्याठिकाणी असलेल्या पाझर तलावांवर अवलंबून असतात. मे महिना अखेरपर्यंत हे पाझर तलाव आटून गेल्यामुळे ग्रामीण भागात पाणीप्रश्‍न निर्माण होतो.

जिल्ह्यातील पूर्वोत्‍तर तालुक्यांतील शेकडो गावे टंचाईग्रस्त म्हणून प्रशासनाने जाहीर केली आहेत. गेल्या तीन वर्षांचा विचार करता पाऊसमान कमी कमी होत गेल्याचे आकडेवारीवरुन दिसते. दोन वर्षांपूर्वी पाऊस लांबल्याने भूगर्भातील पाणीपातळी टिकून राहिली. परिणामी पाणीटंचाई फार जाणवली नाही. त्यानंतर मात्र चित्र बदलले. दोन-तीन वर्षांपासून टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. मात्र कोरोनाच्या दाहकतेमुळे टंचाईच्या चटक्यांकडे फार लक्ष दिले गेले नाही. गेल्यावर्षी पावसाने वेळेतच आटोपते घेतल्यामुळे टंचाईची परिस्थिती भीषण होण्याची चिन्हे आहेत.

‘पाटबंधारे’च्या अनागोंदीचा शेतकर्‍यांना फटका

नदीकाठी असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरींना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गावकर्‍यांकडून नदी व ओढे यांना पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली जाते. मात्र, कार्यालयातील अभियंते दाहकता विचारात न घेताच त्यांची मागणी धुडकावतात. त्यामुळे ‘पाणीबाणी’ निर्माण होते. यात शेतकर्‍यांना मोठा फटका बसतो. यावर्षी तापमानात झालेली वाढ, वेगाने होणारे बाष्पीभवन, शेती आणि उद्योगधंद्यांचे वाढलेले क्षेत्र, त्यातून पाण्याची वाढती मागणी या बाबींचा विचार करून पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

मात्र, पाटबंधारे विभागाचे नियोजन फक्‍त कागदावरच आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे. पाटबंधारेच्या सातारा सिंचन विभागात अनागोंदी आहे. शेतकरी पाणीप्रश्‍न घेऊन येतात त्यावेळी कार्यकारी अभियंताच जाग्यावर नसतो. त्यामुळे येणारा टंचाईचा काळ जिल्हावासीयांसाठी कठीण आहे. जिल्हाधिकार्‍यांनी पाटबंधारे विभागाच्या कारभारात लक्ष घालून जिल्हावासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button