किसान क्रेडिट कार्ड वाटपासाठी आजपासून विशेष मोहीम | पुढारी

किसान क्रेडिट कार्ड वाटपासाठी आजपासून विशेष मोहीम

सातारा : पुढारी वृत्तसेवा

किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड वाटपाकरीता विशेष मोहीमेचे 24 एप्रिल ते 1 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन किसान क्रेडीट कार्ड योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक युवराज पाटील यांनी केले आहे.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ मिळणार्‍या जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांना किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने सुरु असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग म्हणून शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) वाटपासाठी देशभर मोहीम राबवली जात आहे. या मोहीमेअंतर्गत 24 एप्रिल ते 1 मे या कालावधीत सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहेत.सध्या राज्यात लाखो शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत असून त्यापैकी अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड पासून वंचित आहेत.

याकरता विशेष ग्रामसभा आयोजित करून शेतकर्‍यांना कर्ज वाटप केले जाईल या मोहिमेत शासनाचे कृषी, महसूल, ग्रामविकास, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, मत्स्य संवर्धन विभाग, नाबार्ड आणि सर्व बँका सहभागी होणार आहेत. ही मोहीम जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाणार आहे. सर्व शेतकर्‍यांनी किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा अग्रणी व्यवस्थापक युवराज पाटील यांनी केले आहे.

Back to top button