राजकारणात सुसंस्कृतपणा राहिला नाही : आ. ह. साळुंखे | पुढारी

राजकारणात सुसंस्कृतपणा राहिला नाही : आ. ह. साळुंखे

सातारा : पुढारी वृत्तसेवा
राज्यामधील सर्वच पक्षांमधील नेत्यांमध्ये अभ्यासाची कमतरता आहे. त्यांचे वाचन नाही व अभ्यास करण्याची मानसिकताही नाही. कोणताही नेता अभ्यासपूर्ण बोलत नाही. नवीन माणसे घडत असताना परिपक्‍व माणसे त्यांना योग्य माहिती देत नाहीत, त्यामुळेच राजकारणातील सुसंस्कृतपणा राहिलेला नाही, असे मत ज्येष्ठ साहित्यिक आ. ह. साळूंखे यांनी व्यक्‍त केले.

खा. सुप्रिया सुळे यांनी आ. ह. साळूंखे यांच्या शाहूपुरी येथील निवासस्थानी भेट घेवून त्यांच्याशी विविध विषयांवर सुमारे एक तास चर्चा केली. यावेळी राज्यातील राजकारण व नेत्यांची विचारसरणी या विषयांवर जास्त भर देण्यात आला. यावेळी आ. ह. साळुंखे म्हणाले, राज्यातील सर्वच पक्षांमधील नेते कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करताच बोलत असतात. कोणताही नेता अभ्यासपूर्ण बोलत नसल्याचे मी अनेकदा पाहिले आहे. एखाद्या विषयावर डेबिटला बसल्यानंतर संबधित नेत्यांकडून वरवरची उत्तरे दिली जातात. त्या विषयाची खोलवर अशी चर्चा केली जात नाही. त्यामुळे या डेबिट याचा फारसा उपयोग होत नाही. राज्यामध्ये जे काही पक्ष आहेत त्या पक्षांमधील नेत्यांमध्ये अभ्यास करण्याची मानसिकताच नाही. त्यामुळे त्यांच्याकडून वाचन होत नाही. यामुळे राजकारणाची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा राहिलेला नाही. आपल्या पक्षाची विचारसरणी सोडून काही पक्षांच्या नेत्यांकडून वागणूक होते. काँग्रेस पक्षाच्या वाटचालीबद्दल बोलताना आ. ह. साळुंखे म्हणाले, 70 वर्षांपूर्वी जशी काँग्रेस होती तीच काँग्रेस आताही दिसते. त्या काळात पक्षाने स्वत:मध्ये बदल केले नाही. साखर कारखाने, पतसंस्था, बँका व इतर सहकारी संस्थांवर काँग्रेसला पकड बसवता आली नाही. मुळात काळानुसार पक्षात बदल न झाल्यानेच काँग्रेसची ही अवस्था झाली आहे. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजप व आरएसएसची ज्या विचारसरणीवर बांधणी झाली होती त्या विचाराचे भाजप व आरएसएस आता राहिलेली नाही. भाजप आता नेमक्या कोणत्या विचारावर वाटचाल करत आहे हेच समजत नाही. भाजपचा आपला मूळ विचार संपलेला आहे.

Back to top button