सातारा : जिल्ह्यातील एस. टी. सेवा होणार पूर्ववत | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील एस. टी. सेवा होणार पूर्ववत

सातारा : पुढारी वृत्तसेवा
नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या झालेल्या एस. टी. कर्मचार्‍यांचा संप काही प्रमाणात मिटला आहे. याबाबत उच्च न्यायायालयाने निर्देश दिल्यानंतर सेवेत परतणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पाच महिन्यांपासून विस्कळीत झालेली एस. टी. सेवा पूर्ववत सुरू होणार आहे. दरम्यान, सातारा विभागात आतापर्यंत सुमारे 300 हून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

दरम्यान, शासनाने कडक कारवाईचा इशारा दिल्यानंतरही एस. टी. कर्मचार्‍यांचा संप मिटत नव्हता. मात्र, उच्च न्यायालयाचा आदेश व अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेला अटक होताच संपातील सर्व हवा निघून गेली आहे. त्यामुळे सातार्‍यासह विविध आगारात आता मोठ्या प्रमाणात कर्मचारी हजर होत आहे. पुढील काही दिवसात अजूनही कर्मचारी हजर होतील, अशी अपेक्षा एस. टी. महामंडळातील अधिकार्‍यांनी व्यक्‍त केली.

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे यासह विविध मागण्यासंदर्भात एसटी कर्मचार्‍यांनी गेल्या पाच महिन्यापासून संप पुकारला होता. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील एसटी वाहतूक पुर्णपणे कोलमडली होती. तसेच एसटी कर्मचार्‍यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. उच्च न्यायालयात सूनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने कर्मचार्‍यांना कामावर परतण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानंतर कर्मचारी कामावर परतू लागले आहेत.

आठवडाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील आगारांमध्ये सुमारे 300 हून चालक, वाहक व यांत्रिकी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तसेच बडतर्फ केलेल्या 100 हून अधिक कर्मचार्‍यांची अपीले दाखल करून घेण्यात येत आहेत. या अपिलावर कर्मचार्‍यांची सोमवारी विभागीय कार्यालयात सुनावणी होणार आहे.दरम्यान, सर्व आगारात कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होवू लागले असल्याने लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार्‍या एसटी बसेससह ग्रामीण भागातील एसटी फेर्‍या पुर्ववत सुरू होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.

Back to top button