वाई : पसरणी घाटात बर्निंग कारचा थरार | पुढारी

वाई : पसरणी घाटात बर्निंग कारचा थरार

वाई; पुढारी वृत्तसेवा : वाई-पाचगणी रस्त्यावर गुरुवारी पसरणी घाटात भर दुपारी बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून अग्निशमन बंबाला पाचारण करत आगीवर नियंत्रण मिळवले. पनवेल येथून महाबळेश्वरला निघालेल्या पर्यटकांच्या कारला ही दुर्घटना घडली.

पनवेल येथील रहिवासी असलेले ओंकार कृष्णा बसवत व त्यांची बहीण सुजिता कृष्णा बसवत हे गुरुवार, दि. 14 रोजी त्यांच्या कारमधून (एमएच 01 डीपी 0851) महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी निघाले होते. दरम्यान, पसरणी घाट चढताना दुपारी सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारच्या बोनेटमधून अचानक धूर येऊ लागल्याचे कारचालक ओंकार बसवत यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ कार रस्त्याच्या कडेला उभी केली. त्याचवेळी कारने अचानक पेट घेतला. बघता-बघता आगीने उग्ररुप धारण केले. क्षणार्धात कार जळून खाक झाली. कार जळत असताना एक दोन वेळा सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकच घबराट उडाली. गॅसकिट लिक झाल्यामुळे गाडीने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पाचगणी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले. त्यानंतर पाचगणी नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेत कारला लागलेली आग आटोक्यात आणली. दरम्यान, पसरणी घाटात दुपारची वेळ असल्याने कोणताही अनर्थ घडला नाही.

Back to top button