शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याला ठाकरे सरकारच जबाबदार : ना. आठवले | पुढारी

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याला ठाकरे सरकारच जबाबदार : ना. आठवले

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला हा दुर्दैवी व गंभीर आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. मात्र, या घटनेला ठाकरे सरकारच जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला.

सातार्‍यात शासकीय विश्रामगृहावर बोलताना ना. आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 4 राज्यामध्ये भाजपला यश मिळाले ही त्यांच्या कामाची पोहचपावती आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची जागा आम्हीच जिंकू. मायावतींचा करिष्मा संपला असून काँग्रेसला मिळणारी दलितांची मते आता भाजपला मिळत आहेत.

राज्यातील सरकार गेल्यास आमची सरकार बनवण्याची तयारी आहे. हे सरकार पडले नाही तरी 2024 मध्ये बहुमताने आमचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही. तशी आमची तयारी सुरू आहे, असेही ना. आठवले यांनी सांगितले. खा. शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेला हल्‍ला दुर्देवी व गंभीर आहे. आंदोलने शांततेने करायला हवीत. या सर्व प्रकाराची निपक्षपातीपणे चौकशी करून दोषीवर कारवाई करावी. सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी एसटी कर्मचार्‍यांकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे त्या सर्व प्रकाराला उध्दव ठाकरे सरकार जबाबदार आहे.

पेट्रोल डिझेलच्या भाववाढीसंदर्भात बोलताना ना. रामदास आठवले म्हणाले, जसजशा निवडणूका जवळ येतील तसे दर कमी येतील. मात्र दर वाढू नयेत अशीच आमची भूमिका आहे. वाढते दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणूकीत एनडीएला चांगले यश मिळाले असून ही सन 2024 ची रंगीत तालीम होती. 2024 मध्ये एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्‍वास ना. आठवले यांनी व्यक्‍त केला.

दोन्ही राजेंमधील वाद मिटला पाहिजे….

खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही राजेंमध्ये असलेल्या संघर्षाबाबत विचारले असता ना. आठवले म्हणाले, दोन्ही राजे व माझे संबंध चांगले असून त्यांच्यातील वाद मिटला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे.

Back to top button