फलटण सभापतींच्या घरातून 15 लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

फलटण सभापतींच्या घरातून 15 लाखांचा ऐवज लंपास

फलटण; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरुपराजे खर्डेकर यांच्या आसू, (ता. फलटण) येथील बंगल्यातून चोरट्यांनी 15 लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

ही चोरी दोन टप्प्यांत झाली असून चोरट्यांनी त्याचा मागमूसही लागू दिलेला नाही.

चोरीची पहिली घटना 12 जुलै तर दुसरी घटना 29 जुलैला घडली आहे. चोरटा माहीतगार असल्याचा पोलिसांचा कयास आहे.
आसू येथे शिवरुपराजे खर्डेकर यांचा बंगला आहे.

शेतीच्या कामासाठी पैशांची गरज असल्याने दि. 6 जुलै रोजी त्यांनी 7 लाख रुपये रक्कम आपल्या रूममधील कपाटात आणून ठेवली होती. मात्र, त्यावर कोणीतरी डल्ला मारला. याची त्यांना कल्पनाही नव्हती. कपाटातील 7 लाखांची रक्कम गायब झाल्याचे त्यांना सोमवार दि. 12 जुलै रोजी लक्षात आले.

दरम्यान, त्यांनी या पैशाबाबत घरातील सर्वांना विचारले. रक्कम गायब झाल्याची बाहेर कोठेही वाच्यता केली नाही. काही दिवासांनंतर म्हणजेच गुरुवार दि. 29 जुलै रोजी त्यांच्या सुनबाईंच्या रुममधील कपाटातून पाच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिनेही चोरीस गेल्याचे लक्षात आले.

याप्रकारानंतर मात्र शिवरुपराजे खर्डेकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेवून अज्ञाता विरोधात फिर्याद दाखल केली आहे. तपास पोलिस निरीक्षक नितिन सावंत करत आहेत.

Back to top button