सातारा : सातार्‍यात १५ रोजीपासून पाणीकपात | पुढारी

सातारा : सातार्‍यात १५ रोजीपासून पाणीकपात

सातारा : पुढारी वृत्‍तसेवा
कास धरणाची खालावलेली पाणीपातळी आणि शहापूर पाणी योजनचा सतत खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे सातारा पालिकेने 15 एप्रिलपासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील पेठांचे पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून प्रत्येक भागात एक दिवसांचा शटडाऊन राहणार आहे. त्यामुळे यापुढे सातारकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

सातारा शहरास प्रामुख्याने कास धरण आणि उरमोडी नदीवर असलेल्या शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. सदरबझार तसेच हद्दवाढ भागात नव्याने समाविष्ट झालेल्या दरे खुर्द, शाहूपुरी, तामजाई नगर, करंजे ग्रामीण, पिरवाडी, शाहूनगर, गोडोली, विलासपूर या परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. उन्हाची तीव्रता वाढत असताना पाण्याची प्रचंड मागणी वाढत आहे. परिणामी पाणी वितरण व्यवस्थेवर त्याचा ताण येत आहे. तांत्रिक कारणांनी पाणीपुरवठा विस्कळीत होणार्‍या भागात नगरपालिका टँकरने पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. कास धरणाची पाणीपातळी सुमारे 14.5 फूट आहे. या धरणातून प्रामुख्याने शहराच्या पश्‍चिम भागास पाणीपुरवठा केला जातो.

कास धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत एक फूट जादा पाणीसाठा असला तरी जूनमध्ये पाऊस वेळेवर पडेलच हे खात्रीशीरपणे सांगता येत नाही. धरणातील एक फूट पाणीसाठ्यावर शहराची 10-15 दिवस तहान भागते. त्यामुळे नगरपालिकेकडून एप्रिल, मे आणि जून महिन्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरु आहे. नागरिकांची गैरसोयही होणार नाही आणि पाण्याचा योग्य प्रमाणात वापर कसा करता येईल, यादृष्टीने नगरपालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. उरमोडी नदीवर असलेल्या शहापूर पाणीपुरवठा योजनेतून शहराच्या मध्यवर्ती भागास पाणीपुरवठा केला जातो. या योजनेस पुरेशाप्रमाणात पाणी असले तरी त्याठिकाणी सतत वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी विद्युत मोटारी, जलवाहिन्या, व्हॉल्व यावर प्रचंड दाब येवून ते निकामी होण्याचा संभव असतो. सतत देखभाल दुरुस्तीचे काम निघत असते. त्यामुळे दोन्ही पाणी योजनांचा विचार करता पाणीबचत आणि देखभाल दुरुस्तीची कामे लक्षात घेवून एक दिवसांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. एक दिवसांचा शटडाऊन कसा असेल, याचा कच्चा आराखडा पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. शहरातील पेठांचे भाग करण्यात आले असून आठवड्यातून एक दिवस त्याठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा आराखड्यामध्ये काही प्रमाणात बदल आहेत. त्यातील त्रुटी दूर करुन हे नियोजन जाहीर केले जाणार आहे. दि. 15 रोजीपासून पाणी कपात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Back to top button