सातारा: आ. मकरंदआबा, नितीनकाकांचे अर्ज बाद होण्यावरून गोंधळ | पुढारी

सातारा: आ. मकरंदआबा, नितीनकाकांचे अर्ज बाद होण्यावरून गोंधळ

वाई; पुढारी वृत्तसेवा : किसनवीर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील अर्ज छाननीवेळी सोमवारी प्रचंड गदारोळ उडाला. आ. मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांच्या अर्जाबाबत गोंधळ झाला. सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी अर्ज बाद झालेल्यांची यादी वाचून दाखवली. त्यात आ. मकरंद पाटील, नितीनकाका पाटील यांचेही नाव वाचण्यात आले. या दोघांचे अर्ज बाद होण्यावरून प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, सायंकाळी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार हे अर्ज वैध ठरले आहेत. जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी 349 पैकी 245 अर्ज वैध तर 69 अर्ज अवैध ठरल्याचे सांगताना याबाबतची अधिकृत यादी मंगळवारी सकाळी 11 वाजता जाहीर केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

वाई, खंडाळा, जावली, सातारा, कोरेगाव अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी 3 मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी विक्रमी 349 अर्ज दाखल झाले. आ. मकरंद पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, मदनदादा भोसले यांनीही रणांगणात उडी घेतली. आ. महेश शिंदे यांच्या समर्थकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

दाखल झालेल्या सर्व अर्जांची सोमवारी छाननी प्रक्रिया होती. त्यासाठी सकाळपासूनच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. कारखान्यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराने पाच वर्षात किमान तीन वेळा कारखान्याला ऊस घालणे हा पोटनियम आहे. त्याला अनुसरून कारखान्याला एकदाही ऊस न घालणारे किंवा फक्त एकदा ऊस घालणार्‍या उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यानंतर दोन वेळा ऊस घालणार्‍या उमेदवारांची यादी पुढे करण्यात आली. यामध्ये आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांचे नाव अवैध अर्जाच्या यादीत आले. ही दोन्ही नावे पुकारली गेल्याने आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांचे अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली. लगेचच त्यांच्या समर्थकांनी एकच गलका केला तर विरोधकांनीही हे अर्ज बाद झाले पाहिजेत, असा आग्रह धरला. त्यावरून छाननी प्रक्रियेत बरीच तापातापी झाली.

मोठा गोंधळ उडाल्यामुळे जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी वैध व अवैध अर्जांची यादी जाहीर करणे थांबवले. या प्रक्रियेवर आ. मकरंद पाटील गटाने हरकत घेतली. त्यावर आ. पाटील गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.

ज्यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे त्यांनी कारखान्याने ऊस तोड करण्यासाठी नोंदी केल्या होत्या. परंतु, कारखान्यानेच ऊस नेला नाही, हा मुद्दा उपस्थित करत उच्च न्यायालयात झालेल्या खटल्यांचे संदर्भ त्यांच्या वकिलांकडून देण्यात आले. कारखाना चालू नसल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये अर्ज दाखल करणार्‍यांची नव्हे तर कारखान्याची चूक असल्याचे म्हणणे वकिलांकडून मांडण्यात आले. या दरम्यान किसनवीर कारखाना व्यवस्थापनानेही आपली बाजू मांडली.

सायंकाळी या संभ्रमावस्थेबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांशी संपर्क केला असता त्यांनी आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांचे अर्ज वैध असल्याचे सांगितले. त्याचवेळी वैध व अवैध अर्जाची यादी मंगळवारी सकाळी 11 वाजता जाहीर करणार असल्याचेही अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

Back to top button