शिखर शिंगणापूर : माणमधील तलावांमध्ये 50 टक्के पाणीसाठा | पुढारी

शिखर शिंगणापूर : माणमधील तलावांमध्ये 50 टक्के पाणीसाठा

शिखर शिंगणापूर : पुढारी वृत्तसेवा
माण तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यात गेली दोन वर्षे समाधानकारक पाऊस झाल्याने अद्यापही माणमधील प्रमुख तलावांमध्ये 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पर्जन्याचे वाढते प्रमाण व जलसंधारणाची झालेली कामे यामुळे तालुक्याला सध्यातरी टंचाईच्या झळा जाणवणार नसल्याची परिस्थिती आहे. उपलब्ध पाणीसाठ्यामुळे सध्यातरी प्रशासनावर ताण येत नसल्याचे चित्र आहे.

निसर्गाची अवकृपा असलेल्या दुष्काळी माण तालुक्यातील जनतेला नेहमीच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. माण तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 450 मिलीमीटर असून गेल्या काही वर्षांत तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होत आहे. गेल्या दोन वर्षातही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने ओढे, नाले, विहीरींसह मध्यम व लघु प्रकल्प तुडूंब भरले होते. माणच्या दुष्काळी पट्ट्यात डिसेंबरपासूनच टंचाईच्या झळा जाणवत असतात. परंतु सलग दोन वर्षांपासून माण तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील सर्वच भागातील पाणीसाठे ओसंडून वाहिले. तर मोसमी पावसाबरोबरच अवकाळी पावसानेही झोडपून काढल्यामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच गावोगावी जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाल्यामुळे मार्च महिना संपत आला तरीही तालुक्याला टंचाईची तीव्रता जाणवत नसल्याचे चित्र आहे.

सध्या तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील दहा प्रमुख तलावांमध्ये एकूण जलसाठ्याच्या पन्नास टक्के जलसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील दहा तलावांची एकूण पाणीसाठवण क्षमता 35.37 दशलक्ष घनमीटर असून एकूण सध्या 18.80 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये जाशी व राणंद तलावात सत्तर टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध असून ब्रिटीशकालीन पिंगळी व लोधवडे तलावात क्षमतेच्या चाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील सर्वाधिक पाणीसाठा होणार्‍या आंधळी धरण क्षेत्रात अठ्ठावीस टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून गंगोती व महाबळेश्‍वरवाडी तलावात पंचवीस टक्क्यांहून कमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मासाळवाडी वगळता अन्य सर्वच तलावात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यास तलावांतील पाणीपातळी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

माणदेशात दिलासादायक चित्र…

माणगंगा नदीवरील अनेक ठिकाणचे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, सिमेंट साखळी बंधारे अजून तुडूंब भरून आहेत. सिमेंट साखळी बंधार्‍यामुळे आजूबाजूच्या विहीरींच्या पाणीपातळीत अजून घट झाली नाही. दुष्काळी भागात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सध्यातरी टंचाईच्या झळा जाणवत नसल्याने माणदेशी जनतेसह प्रशासनाच्या दृष्टीने दिलासादायक चित्र दिसून येत आहे.

Back to top button