सातार्‍यासह अकरा जिल्ह्यांत निर्बंध कायम | पुढारी

सातार्‍यासह अकरा जिल्ह्यांत निर्बंध कायम

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या आणि रुग्णसंख्येची टक्केवारी घटलेल्या मुंबई, पुण्यासह 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा आदी 11 जिल्ह्यांना अद्याप तिसर्‍या श्रेणीत ठेवण्यात आल्याने कोरोनाचे निर्बंध कायम ठेवले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

या संदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिला असून दोन दिवसांत निर्णय घेऊन तसा जीआर काढला जाईल, असे टोपे म्हणाले. मुंबईतील लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी खुला करण्यावर आजही निर्णय झाला नाही. त्यावर दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत.

दोन डोस झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यावर सरकार सकारात्मक असले, तरी तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेऊन 15 ऑगस्टपर्यंत यावर निर्णय होण्याची शक्यता नाही.

कोव्हिड टास्क फोर्सची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंधांच्या शिथिलीकरणाबाबत माहिती दिली.

कोरोना रुग्णवाढीचा दर आणि मृत्यू दर कमी असलेल्या 25 जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली असून, मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे लसीकरणावर भर देऊन रुग्णवाढ कमी असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध उठवले जातील, असे ते म्हणाले.

मुंबई लोकल अद्याप नाहीच

लाखो लोकांची नजर लागून राहिलेला मुंबईचा लोकल प्रवास सर्वसामान्य जनतेसाठी सुरू करण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. कोव्हिड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यावर विचार झाला. त्यासाठी रेल्वे बोर्डाशी चर्चा केली जाणार असल्याचे टोपे म्हणाले.

शनिवारी दुकाने सुरू करण्यावर विचार

राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये असलेले निर्बंध कायम ठेवून त्यात काहीशी शिशिलता आणण्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगताना, तिसर्‍या टप्प्यातील जिल्ह्यांतील दुकाने आता शनिवारीही दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा विचार सुरू आहे.

रविवारी मात्र सर्व व्यवहार बंद राहतील. आठवड्यातील अन्य दिवशी दुकानांची वेळ रात्री आठपर्यंत वाढवण्याचा विचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

…तर निर्बंध कडक

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, बीड, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तिसर्‍या टप्प्यातील निर्बंध कायम असतील.

मात्र, या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढ झाल्यास निर्बंध आणखी कडक करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

राज्याचे अर्थचक्र सुरळीतपणे चालावे, यासाठी निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याची आवश्यकता असून, जिथे ती आणली जाईल, तेथील कार्यालये 50 टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. मात्र, एसी वापरास बंदी असेल. याशिवाय रेस्टॉरंटस्, सलून पार्लर हळूहळू अधिक संख्येने सुरू करता येतील.

निर्बंध कायम असलेले जिल्हे

कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही जास्त असलेल्या 11 जिल्ह्यांना श्रेणी-3 च्या निर्बंधांमध्येच ठेवले जाईल. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर हे चार जिल्हे आणि मराठवाड्यातील बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहतील.

Back to top button