सातारा : गुगलने भ्रष्टाचारी ठरवलेल्यांनी नादी लागू नये | पुढारी

सातारा : गुगलने भ्रष्टाचारी ठरवलेल्यांनी नादी लागू नये

खटाव : पुढारी वृत्तसेवा
अपयशी ठरलेल्या आणि सर्वसामान्य जनतेच्या मुळावर उठलेल्या आघाडी सरकारचा अंत दृष्टीक्षेपात आला आहे. भाजपच जनतेच्या समस्या सोडवून सर्वांगीण विकास साधणारा पक्ष आहे. भाजपचे विचार गावोगावी पोहचवण्यासाठी कटीबद्ध होवून काम करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी केले. दरम्यान, गुगलने देशातील सर्वाधिक भ्रष्ट अधिकारी ठरवलेल्यांनी माझ्या नादाला लागू नये. अन्यथा या वयात पळता भुई थोडी होईल, असा इशाराही आ. गोरे यांनी दिला.

धामणी येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, जि.प. सदस्य अरूण गोरे, शिवाजीराव देशमुख, सोमनाथ भोसले, नितीन दोशी, हरिभाऊ जगदाळे, अतुल जाधव, धनाजी जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आ. जयकुमार गोरे म्हणाले, भाजपने वीज तोडणी थांबवायला लावली. शेतकर्‍यांना 50 हजारांचे सानुग्राह अनुदान देण्यास भाग पाडले आहे. 12 वर्षात माण-खटाव मतदारसंघातील प्रत्येक गावाला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी व दुष्काळी कलंक पुसण्यासाठी अहोरात्र झटलो आहे. उरमोडीचे पाणी आल्याने मतदारसंघाचा बराच भाग दुष्काळमुक्त झाला आहे. जिहे-कठापूरसाठी 700 कोटी मंजूर करून घेतले आहेत. पाच वर्षानंतर या भागाला दुष्काळी म्हणण्याची कुणाची हिंमत होणार नाही असे मी काम करणार आहे. मातीच्या आत्मसन्मानाची व दुष्काळाविरोधातील लढाई सुरू असताना काहींची वायफळ बडबड सुरू आहे. गुगलने सर्वाधिक भ्रष्टाचारी ठरवलेल्यांच्या मालकाने माझी 12 वर्षे चौकशीच केलीय. आता हा गडी चौकशी करायला निघाला आहे. तुमचे सरकार आहे, लावा माझी चौकशी. एक दिवस तरी मला आत टाका.

तीनशे एकर जमिन, कोट्यवधींची प्रॉपर्टी, मॉल, मगरपट्टा, सातार्‍यातील आणि इतर ठिकाणी असणारे भूखंड रडावर आहेत. जयकुमार जेव्हा तुमची चौकशी लावेल तेव्हा दोन वर्षे जामीन मिळायचा नाही. पवारांनी मुख्यमंत्री असताना यांना पीए म्हणून ठेवले, जिल्हाधिकारी, सीओ, आयुक्त, सचिव केले. एमआयडीसीचे सीओ असताना आपल्या भागात यांनी किती वसाहती आणल्या ते जनतेला एकदा सांगावे, असेही आ. गोरे म्हणाले.

जनाची नाही, मनाची तरी वाटू द्या

कोरोना काळात आम्ही साडे तीन हजार रुग्णांवर उपचार केले. डॉक्टरही वॉर्डमध्ये जायला कचरत होते तेव्हा जयकुमार आत जाऊन रुग्णांची विचारपूस करुन धीर देत होता. कोट्यवधी खर्चून माझ्या जनतेवर मी उपचार केले. तेव्हा हे महाशय पुण्यात लपून बसले होते. त्यांना उरमोडी आणि जिहे-कठापूर माहित नाही आणि पाणी कुठे आहे असे विचारतात. त्यांचा ऊस मी आणलेल्या उरमोडीच्या पाण्यावर भिजतो. आता जिहे-कठापूरचे पाणी आंधळीत आणून ते उचलणार आहे. ग्रॅव्हिटीने ते वंचित 32 गावांना देणार आहे. त्यामुळे त्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू द्या, असा टोलाही आ. गोरे यांनी लगावला.

Back to top button