सातारा : भाजी विक्रीची साधने कालबाह्य | पुढारी

सातारा : भाजी विक्रीची साधने कालबाह्य

उंडाळे : पुढारी वृत्तसेवा :  शेतकर्‍याने शेतात पिकवलेला भाजीपाला बाजारपेठेत आणण्यासाठी पूर्वी वापरल्या जाणार्‍या साधनात अमूलाग्र बदल झाला आहे. जुनी वापरली जाणारी साधने आता कालबाह्य होऊन आता नव्याने सर्व भाजीपाला प्लास्टिकच्या पिशव्यातून बाजारपेठेत विक्रीस येऊ लागला आहे.

शेतात पिकलेला भाजीपाला बाजारपेठेत आणण्यासाठी पूर्वी झाडपाला, उसाचे वाडे जाड कागदाचे बॉक्स, ज्वारीचा गहू, कडबा याचा वापर करून शेतकरी आपला माल पॅकींग करून बाजारपेठेत आणला जात होता. पुढे त्याची जागा गोणपाटाच्या पोतेने घेतली.

पुढे गोणपाटाचा वापर कमी झाल्यानंतर प्लास्टिक लागवड किंवा जाड पोती वापरण्यात येऊ लागली. त्याही पुढे जाऊन आता प्लास्टिक कॅरेट या मधून भाजीपाला बाजारपेठेत येऊ लागला.

परंतु अलीकडच्या काळात या सर्व साधनांचा वापर बाजूला पडून थेट प्लास्टिकच्या पिशवीतून भाजीपाला बाजारपेठेत विक्रीस येऊ लागला आहे. मोठी आणि जाड आकाराची पिशवी करून त्यामध्ये कोणताही प्रकारचा भाजीपाला घालून तो भाजीपाला मोठ्या मार्केटमध्ये विक्रीस येत आहे.

भेंडी, गवार, कारली, गाजर, बीट, दोडका, पावटा, घेवडा, फ्लावर, कोबी, दुधी, ढबू मिरची, हिरवी मिरची, वाटाणा, पालेभाज्या यासह बहुतांश ओला भाजीपाला याच पिशव्यातून बाजारपेठेत येत आहे.

शेतकर्‍यांनी पॅकिंगचे तंत्र शिकावे

प्लास्टिक पिशवीतून बाजारपेठेत जाणारा हाच शेतीमाल पुन्हा मुंबई-पुण्याच्या बाजारात देखणे आकर्षक पॅकिंगमध्ये घालून तोच माल मॉलमध्ये वेगळ्या आकर्षक पॅकिंगमध्ये वेगळ्या व दिखाऊ पॅकिंगमध्ये जातो. त्यामुळे शेतकर्‍याला मिळणारा दर आणि पॅकिंगमधून मॉलमध्ये विकला जाणारा दर यामध्ये मोठी तफावत असते. हेच पॅकिंगचे तंत्र शेतकर्‍यांनी आत्मसात करण्याची गरज आहे.

Back to top button