कराड : बाजार समितीमुळे बदलणार गणिते | पुढारी

कराड : बाजार समितीमुळे बदलणार गणिते

कराड : पुढारी वृत्तसेवा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे नगरपालिका, जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या आहेत. मात्र, असे असले तरी सोसायटी निवडणुका झाल्यानंतर महिनाभराने राज्य शासन बाजार समिती निवडणुकीबाबत निर्णय घेणार आहे. म्हणूनच एप्रिल – मे महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, या निवडणुकीत अनेक राजकीय उलथापालथी पहावयास मिळतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळेच या राजकीय उलथापालथींचा कराड तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कराड नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेवर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपल्याने आता कारभार प्रशासकांच्या हाती गेला आहे. त्यामुळेच नगरसेवक, जिल्हा परिषद – पंचायत समिती सदस्यांना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. मात्र, पावसाळ्यापर्यंत या निवडणुका होणे शक्य नसल्यासारखी परिस्थिती असून कदाचित दिवाळीपर्यंत निवडणुकांसाठी वाट पाहावी लागणार, असेच बोलले जात आहे. एकीकडे असे असताना राज्यातील मुदत संपलेल्या शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत एप्रिल महिन्यात राज्य शासनाकडून निर्णय घेतला जाईल, असे संकेत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. कराड बाजार समितीची निवडणूक जून 2020 नंतर होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. मध्यतंरी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, मुदत संपलेल्या सोसायटी निवडणुका झाल्याशिवाय बाजार समितीची निवडणूक घेतल्या जाऊ नयेत, अशी भूमिका घेण्यात आल्याने या निवडणुकाही लांबणीवर पडल्या आहेत. एप्रिल महिन्यात सोसायटी निवडणुका पूर्ण होतील आणि त्यानंतर राज्य शासन निवडणुकीबाबत निर्णय घेणार असल्याने कराड नगरपालिका, जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच बाजार समिती निवडणूक होण्याची शक्यता वाढली आहे.

कराड बाजार समितीवर काँग्रेस नेते अ‍ॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर गटाचे वर्चस्व आहे. सद्य राजकीय परिस्थिती पाहता आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनाच साथ देण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत 2015 साली गेलेली सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील गट पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार, हे स्पष्ट आहे. एकीकडे अशी राजकीय परिस्थिती असताना कराड दक्षिणेतील प्रबळ गटापैकी एक असणार्‍या भाजप नेते डॉ. अतुल भोसले गटाची भूमिका मोलाची ठरणार आहे. 2015 साली झालेल्या निवडणुकीत डॉ. भोसले गटाने सत्ताधारी उंडाळकर गटास मदत केली होती. मात्र, मागील तीन ते चार महिन्यांतील घडामोडी पाहता डॉ. अतुल भोसले गट पालकमंत्री बाळासाहेब पाटील गटासोबत या निवडणुकीत दिसल्यास कोणतेही आश्‍चर्य वाटणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे. साहजिकच असे झाल्यास या राजकीय घडामोडींचे परिणाम आगामी कराड नगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पहावयास मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच तालुक्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येतील, असेच बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोण असणार ..?

कराड दक्षिणेत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मर्यादित आहे. त्यामुळे कराड उत्तरमध्ये पंचायत समितीच्या सर्व जागांवर विजय मिळवल्यानंतर बहुमताचा आकडा गाठणे राष्ट्रवादीसाठी एक आव्हानच असणार आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आ. पृथ्वीराज चव्हाण गट किंवा भाजपशी जवळीक साधेल, असे बोलले जात आहे. मात्र, बदललेल्या परिस्थितीत आ. चव्हाण गटासाठी सोपे नसेल, अशीही चर्चा आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कोण असणार ? याबाबत तर्कविर्तक सुरू झाले आहेत.

Back to top button