सातारा : ग्रामीण भागात जत्रा-यात्रांचा हंगाम बहरला | पुढारी

सातारा : ग्रामीण भागात जत्रा-यात्रांचा हंगाम बहरला

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सध्या कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाचे निर्बंध उठले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम वेगावला आहे. ग्रामदैवतांच्या यात्रेच्यानिमित्ताने चाकरमान्यांसह पै-पाहुण्यांचा राबता वाढला आहे. या यात्रांमध्ये गुलाल-खोबरे, गोंडे, मिठाई, आईस्क्रीमसह खेळण्यांपासून गृहोपयोगी वस्तूंची दुकाने, विविध खेळ, पाळणे आदींमधून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने फिरत्या व्यावसायिकांना अच्छे दिन येऊ लागले आहेत.

मागील दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे गर्दी होणार्‍या सण-समारंभांवर शासनाने निर्बंध लावले होते. ‘देवां’सह देऊळही बंद झाले होते. यामुळे गावोगावच्या यात्रा-जत्रा निर्बंधांच्या जोखडात अडकल्या होत्या. सर्वजण संसर्गाच्या धास्तीखाली वावरत होते. त्यामुळे सण समारंभांसह ग्रामदैवतांच्या वार्षिक यात्रादेखील साध्या पद्धतीने साजर्‍या होत होत्या. यात्रेला नेहमी येणारे पाहुणेही यात्रेला फिरकत नव्हते. मात्र, यावर्षी कोरोना निर्बंध हटले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम बहरू लागला आहे. यात्रेसाठी येणार्‍या चाकरमान्यांसह पै-पाहुण्यांचा राबता वाढला आहे.

तब्बल दोन वर्षांनी मोठ्या प्रमाणावर यात्रा भरवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. यात्रेनिमित्ताने सर्व पै-पाहुणे एकत्र जमून गाठीभेटी होत असतात. या भेटींमध्ये विचारांची देवाण-घेवाण होते. लग्न, कार्ये जुळून येतात. कोरोना काळात यात्रा भरवण्यात न आल्याने त्यावर अवलंबून असलेल्या फिरत्या व्यावसायिकांचा आर्थिक कणाच मोडला होता. परंतु, कोरोनाचे निर्बंध हटून यावर्षी जोरदारपणे यात्रा भरू लागल्याने या व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत.

माशा, जंगी कुस्त्यांचे फड..

ग्रामीण भागातील यात्रा या लोककलावंतांच्या तमाशा आणि कुस्त्यांच्या फडाशिवाय पूर्णच होत नाहीत. ग्रामीण भागात तमाशा आणि कुस्ती शौकिनांची संख्याही मोठी आहे. त्यातच शासनाचे निर्बंध उठल्याने यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणावर साजर्‍या होत असल्याने बैलगाडी शर्यतीसह तमाशा आणि जंगी कुस्त्यांचे फड रंगू लागलेत. कोरोनाने विस्कटलेले तमासगिरांचे फड आता पुन्हा नव्या उमेदीने उभे राहिले आहेत.

हेही वाचलत का ?

Back to top button