वाढदिवस विशेष : नामदार बाळासाहेब पाटील लय भारी कारभारी | पुढारी

वाढदिवस विशेष : नामदार बाळासाहेब पाटील लय भारी कारभारी

सातारा : बाळासाहेब पाटील आज नामदार आहेत. कराडसह सातारा जिल्ह्याची शान आहेत. ते आमदार नव्हते, तेव्हापासूनचा त्यांचा माझा परिचय आहे. या व्यक्तीमध्ये एवढी सहनशीलता आणि ताकद कुठून येते ? हेच खरं कळत नाही. स्व. यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांचे विचार जोपासत नामदार बाळासाहेब पाटील हे जिल्ह्याचा कारभार पहात असून त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्याचा ते नेहमीच प्रयत्न करतातच. मात्र ते करतानाच ‘साहेबां’च्या नावाला कुठेही डाग लागता कामा नये, यासाठी सहकारमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्यासह त्यांचे सर्व कुटूंबियांकडून नेहमीच काटेकोरपणे योग्य ती दक्षता घेतली जाते.

1997 साली करवडी येथे माझ्या लग्नाला आलेले बाळासाहेब पाटील मला आठवतात. सफारी घालून आलेले बाळासाहेब पाटील तेव्हा सह्याद्रि कारखान्याचे नुकतेच चेअरमन झाले होते. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने मुलांना बाहेर काढण्याचे कौशल्य किंवा दूरद़ृष्टी फक्त पी. डी. पाटील साहेब यांच्याकडेच असावी. 1996 साली सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेण्यापूर्वी साहेबांनी आपल्या सर्व मुलांना योग्य जागी संधी दिली आणि त्यांच्या सर्व मुलानींही अतिशय योग्य पद्धतीने कार्यभार सांभाळत सर्वच पातळीवर साहेबांची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

पी. डी. पाटील साहेब यांनी सर्वात मोठी जबाबदारी

बाळासाहेब पाटील यांच्याकडे पी. डी. पाटील साहेब यांनी सर्वात मोठी जबाबदारी का दिली? याचा जेव्हा माझ्यासह सर्वजण विचार करतात, तेव्हा उत्तर येते त्यांच्यामध्ये असणारा संयम आणि सहनशीलता. बाळासाहेबांमध्ये असणारे गुणही त्यांनी परखले असतील. पी. डी. पाटील साहेब यांचे सर्व सुपूत्र त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रयत्न करत असतात. मुलांना योग्य जबाबदारी योग्य दिल्यामुळेच सहकारी संस्था, शिक्षण संस्था, शेती, बँक, समाजकारण, कराड नगरपालिका, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासह कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकारणणात पी. डी. पाटील साहेब यांच्या नावाचा अजूनही दबदबा कायम आहे.

सह्याद्री साखर कारखान्याची जबाबदारी बाळासाहेब पाटील यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी गेल्या 25 वर्षात सह्याद्रि कारखान्याला एका उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे. स्व. पी. डी. पाटील यांनी स्थापन केलेला कारखाना योग्य नियोजन, अभ्यास, काटकसर या त्रिसूत्रीवर नामदार बाळासाहेब पाटील हे पुढे नेत आहेत. राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि नव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कल्पनेतून साकार झालेला हा कारखाना फक्त सभासदांचा आहे, याचे भान ठेवूनच या संचालक मंडळाचा कारभार चालतो. या कारखान्यात संचालकांना भत्ता किंवा गाडी देण्याची, संचालक मंडळाच्या घरच्या कार्यक्रमाला कारखान्याची यंत्रणा देण्याची पद्धत नाही.

25 वर्षापासून नामदार बाळासाहेब पाटील कारखान्याचे चेअरमन

गेल्या 25 वर्षापासून नामदार बाळासाहेब पाटील या कारखान्याचे चेअरमन आहेत. ही वास्तू सभासदांची आहे. या कारखान्याची स्थापना झाल्यानंतर पी. डी. पाटील साहेबांनी हा कारखाना मुलाप्रमाणे जपला आहे, याचे भान ठेवून काम करणारा नामदार बाळासाहेब पाटील यांच्यासारखा चेअरमन सभासदांनी अनेकदा अनुभवला आहे. नामदार बाळासाहेब कोणत्याही दौर्‍यावरून परत येत असताना रात्रीच्या दोन वाजले तरी ते कारखान्यांमध्ये जातात. कधी कराडमध्ये लवकर पोहोचले किंवा नियोजित कार्यक्रम रद्द झाला, तर अचानकपणे कितीही वाजता कारखान्यात जातात. वेगवेगळ्या युनिटला भेट देतात. कुठे कचरा पडला आहे का? कुठे एखादे मशीन बंद आहे का? एखाद्या युनिटमध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली आहे का ? कामगारांच्या काही अडचणी आहेत का? याची माहिती घेतात. कारखान्यातल्या प्रत्येक विभागाची मशिनरीची त्यांना इतंभूत माहिती आहे. अगदी छोट्या मोठ्या मशिनरींची किंमत सुद्धा माहिती आहे. एखाद्या मशीनमध्ये वेगळा आवाज येत असला तरी ओळखतात, तिथे उपस्थित तंत्रज्ञाला सांगतात. उसाचे टिपरे जरी खाली पडलेले असले किंवा कुठे साखर खाली पडत असली, तर उपस्थित लोकांना नजरेखाली आणून देतात.

सह्याद्री कारखान्याचा वार्षिक सर्वसाधारण सभा पॅटर्न राज्यभर आदर्श का मानला जातो ? याचे कारण म्हणजे इथे सभासदांना बोलू दिले जाते, कुणावरही अन्याय केला जात नाही. कारखान्याच्या सभांमध्ये विरोधकांना बोलण्यासाठी खाली स्वतंत्र माईक ठेवण्याची सह्याद्रीमध्ये अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. ज्याला बोलायचे आहे, त्यांनी त्या माईक जवळ बसायचे, त्यांचे प्रश्न मांडायचे आणि संचालक मंडळाने त्याची उत्तरे द्यायची अशी एक पद्धत आहे. मी स्वतः सह्याद्री कारखानाचा सभासद असून पत्रकार म्हणून अनेक वार्षिक सभांना उपस्थित राहिलो आहे.

बाळासाहेबांच्या कार्यपद्धतीमुळे विरोधक ही नरमतात

मागील वीस वर्षात सभेच्या वेळी तात्विक मुद्यावर जोरदार विरोध करणारे विरोधक नामदार बाळासाहेबांच्या कार्यपद्धतीमुळे बाळासाहेबांच्या जवळचे झालेले आहेत. या लोकांना किंवा लोकांचा विरोध नामदार बाळासाहेबांनी मोडून काढला नाही, तर या विरोधकांचे म्हणणे विचारात घेतले. त्यांच्यामध्ये जे चांगले आहे, त्याचे अनुकरण करत कारखान्याच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा जरूर प्रयत्न केला आहे. कारखान्याच्या हितासाठी जे करता येईल, ते करत असतात. म्हणून विरोधक सुद्धा नामदार बाळासाहेब पाटील यांच्या जवळचे होतात.

यापूर्वीच्या 11 पंचवार्षिक निवडणुकांपैकी तब्बल 8 निवडणुका बिनविरोध अथवा अशंतः बिनविरोध झाल्या आहेत. प्रति हंगाम 1 हजार 500 कोटीची उलाढाल असणारा हा सहकारी कारखाना बिनविरोध होतो, हीच चेअरमन म्हणून नामदार बाळासाहेब पाटील यांच्या कामाची पोहचपावती आहे.

नामदार बाळासाहेब पाटील 1999 साली पहिल्यांदा आमदार

नामदार बाळासाहेब पाटील 1999 साली पहिल्यांदा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. तेव्हापासून त्यांचा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधील जनसंपर्क सतत वाढतच गेला. 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांच्यासमोर आनंदराव पाटील यांचे काँग्रेस पक्षामधून आव्हान होते. त्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांचा नावाचा दबदबा शहर आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये असल्यामुळे बाळासाहेबांना ही निवडणूक सोपी होती. त्यानंतर सन 2004 साली विरोधक कराड शहरातील अरुण जाधव हे विरोधात निवडणूक लढवत होते. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात पी. डी. पाटील साहेबांचा मतदारसंघातील जनसंपर्क आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी केलेला जोरदार प्रयत्न यामुळे बाळासाहेब पाटील हे विजयी झाले होते.

त्यानंतर 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नामदार बाळासाहेब पाटील यांना पक्षाने डावलून अतुल भोसले यांना तिकिट दिले होते.

अशा वेळी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन बाळासाहेब पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले आणि जनतेने त्यांना विक्रमी 41 हजारांच्या मताधिक्याने विजयी केले होते.

नामदार बाळासाहेब पाटील यांचा लोकसंपर्क, मतदारसंघाचा चौफेर विकास यावर या विजयामुळे मोहोर उठली होती.

त्यानंतर नामदार बाळासाहेब पाटील यांनी अधिक गतीने मतदारसंघाचा विकास केला आहे.

सलग पाचवेळा निवडून येण्याचा बहुमान

परिणामी 2014 साली नामदार बाळासाहेब पाटील, धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे अशी तिरंगी निवडणूक झाली होती. या निवडणुकीतही नामदार बाळासाहेब पाटील यांनीच बाजी मारली.

दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांनी त्याच दोन्ही विरोधकांना 40 हजारांहून अधिक मताधिक्याने पाणी पाजून ते सलग पाचव्यांदा विजयी होऊन विधानसभेत गेले.

बाळासाहेब पाटील यांचा पाच विधानसभा निवडणुकीतील कामाचा आणि विजयाचा चढता क्रम पाहिला, तर याचे श्रेय त्यांच्यामधील अभ्यासू नेतृत्वाला आणि गावागावातील जनसंपर्काला जाते.

जुना उत्तर मतदारसंघ असो वा नवीन असो, या सर्व गावात सह्याद्री कारखान्याचे फार मोठे नेटवर्क आहे. पैशाने किंवा जेवणावळीने नव्हे तर विकासकामांच्या आणि नियोजनाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याची त्यांची खास पद्धत आहे.

पक्षातील अनेकांना त्यांची काम करण्याची पद्धत आवडत नाही किंवा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे आश्चर्य वाटते.

सर्वसामान्य हिताला प्राधान्य देत मतदारसंघाचा कायापालट करत नामदार बाळासाहेब पाटील यांनी एक वेगळा पॅटर्न तयार करणार्‍या नामदार बाळासाहेबांना त्यांच्या सहकारातील आणि विशेषतः साखर कारखान्यातील मोठ्या अभ्यासाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी थेट कॅबिनेट मंत्रिपदी काम करण्याची संधी दिली.

मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही

मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही, असं म्हणतात.

मात्र त्याला नामदार बाळासाहेबासारखा एखादा अपवादही असतो.

पी. डी. पाटील यांचे कार्य आभाळाएवढे आहे, यात वादच नाही. त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची कधी संधी मिळाली नाही.

कराडचे नगराध्यक्ष म्हणून पी. डी. पाटील यांची कारकीर्द विश्वविक्रमी आहे.

मात्र पी. डी. पाटील यांचे मन कराड शहर आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाशिवाय अन्य कुठे रमले नाही.

मात्र त्यांच्या पुढे एक पाऊल जाऊन चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असणार्‍या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब पाटील यांनी दबदबा निर्माण केला आहे.

कारखाना उच्च पातळीवर नेऊन ठेवला असून राज्यात सर्वाधिक ऊस दर सभासदांना दिला.

विधानसभेत सलग पाचव्यांदा जाऊन मंत्रीपदी निवड झाली. आज ते संपूर्ण जिल्ह्याचा, राज्याचा कारभार पहात आहेत.

‘बाप से बेटा सवाई’ हे राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी करून दाखवले आहे.

मंत्रीपदी निवड झाल्यानंतर नामदार बाळासाहेबांनी आपल्या कामाची पद्धत व सवय बदललेली नाही.

‘काम जास्त अन् बोलणे कमी’ या उक्तीप्रमाणे सह्याद्रि कारखान्यात निर्माण केलेला पॅटर्न त्यांनी सातारा जिल्ह्यात सुरू केला आहे.

त्यामुळेच कोरोनामुळे निर्माण झालेली अतिशय भयावह परिस्थिती, त्यानंतर या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नामदार बाळासाहेब यांच्या संयमी नेतृत्वाचा नक्कीच जिल्ह्याला फायदा झाला आहे.

योग्य नियोजनामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणाबरोबरच दोन ते तीन वेळा आलेल्या पूरपरिस्थितीला नामदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने चांगली पद्धतीने तोंड दिले आहे.

कॅबिनेट मंत्री असूनही गाजावाजा न करणारे व्यक्तिमत्व

बाळासाहेब पाटील यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांना जिल्ह्यात एक वेगळा आदर मिळतो.

कॅबिनेट मंत्री असूनही गाजावाजा न करणारा केवळ निवडक लोकांना आणि प्रशासनाला घेऊन आंबेघर सारख्या दुर्गम गावाला प्रतिकूल परिस्थितीतही भेट दिली.

अगोदरच गावागावची नाडी ओळखणारा, सर्वसामान्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा मंत्री म्हणून त्यांची ओळख होती आणि आता ती अधिक घट्ट झाली आहे.

खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्हा हा बालेकिल्ला आहे.

या बालेकिल्ल्यात नामदार बाळासाहेब पाटील यांना पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

पक्षातील ज्येष्ठ, समवयस्क तसेच युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मागील दीड वर्ष पक्ष वाढीसोबत पक्षीय, राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वसामान्यांसह जिल्ह्याच्या हिताला नामदार बाळासाहेब पाटील यांनी प्राधान्य दिले आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट ओढवले.

त्या अगोदर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.

पक्ष वाढीबरोबरच विकासकामांवर भर देऊन आपले स्थान मजबूत केले आहे.

मंत्रिमंडळात बाळासाहेब पाटील यांच्याकडे अतिशय आदराने पाहिले जाते.

त्यांच्याकडे पक्षाने सहकार खात्यातील खात्याची जबाबदारी देताना हे खात्याचा कारभार पारदर्शकपणे होईल, याची खात्री असल्यामुळेच ही जबाबदारी दिली होती.

गेल्या दीड वर्षात सहकार खात्यातील अनेक बदल, हे याचेच द्योतक आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. पी. डी. पाटील यांचे विचार व आदर्शानुसार मार्गाक्रमण करणार्‍या नामदार बाळासाहेब पाटील यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर आजवर जिल्ह्याला सदैव पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे.

संकटाला कणखरपणे तोंड देणारे बाळासाहेब

कोणत्याही संकटाला खंबीरपणे तोंड देण्याचा नामदार बाळासाहेब पाटील यांचा गुण अनेकांनी पाहिला आहे.

मात्र हळवे नामदार बाळासाहेब खूप कमी जणांनी अनुभवले आहेत.

वैयक्तिक किंवा घरगुती कोणत्याही संकटाला कणखरपणे तोंड देणारे बाळासाहेब पाटील,

पी. डी. पाटील यांच्यानंतर त्यांच्या घराचे नेतृत्व करणारे बाळासाहेब पाटील, कुटूंब प्रमुख म्हणून घरातील सर्वांना विचारात घेऊन त्यांच्यावर हृदयापासून प्रेम करणार्‍या बाळासाहेब पाटील यांना मी पाहिले आहे.

माझ्या भाऊजींमुळे त्यांच्या कुटुंबाशी निर्माण झालेल्या जवळच्या संबंधांमुळे बाळासाहेबांचा त्यांच्या कुटुंबातील सदस्यासोबत असणारा स्नेह मला जवळून अनुभवता आला आहे.

काटेकोरपणा आणि अचूकता बाळासाहेबांनी पी. डी. पाटील यांच्याकडून घेतलेला आहे.

त्यांचे अनेक उदाहरणे देता येतील.

दोन दिवसापूर्वी कोयनानगर येथे पत्रकारपरिषदेवेळी नामदार बाळासाहेब पाटील यांच्याशी माझी भेट झाली.

पत्रकार हॉलमध्ये कोपर्‍यावर एका खुर्चीवर बसलो होतो, त्या खुर्चीच्या खाली असणारे पायदानी खुर्चीखाली अडकली होती.

नामदार बाळासाहेब पाटील यांचा या हॉलमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांनी हात खांद्यावर ठेवून सतीश जरा उठा, असे सांगितले.

मला वाटले माझ्याकडे काही तरी काम असेल, तर त्यांनी मला उठून ती खुर्ची बाजूला करत पायाने पायदानी सरळ केली.

एक कॅबिनेट मंत्री हे करू शकतो, याचे माझ्यासह उपस्थित सर्वांना आश्चर्य वाटले.

सामान्य नागरीकांचे आधारवड

गेल्या आठवड्यात पावसाने कोयनानगर विभागासह सातारा जिल्ह्यात हाहाकार माजवला होता.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोक गाडले गेले होते.

आंबेघरसारख्या दुर्गम भागात जाणे, खरं म्हणजे दिव्य होते.

या ठिकाणी मंत्री जाऊ शकेल, हे तेथे गेल्यावर कोणालाही पटणार नाही.

मात्र नामदार बाळासाहेब पाटील सुमारे दोन तास चिखलातून, दगडातून आणि निसरड्या पायवाटेने पायपीट करत आंबेघरमध्ये पोहचले होते.

त्यांच्या या कामाचे फार मोठे कौतुक झाले आहे.

मात्र कौतुकाने हुरळून जाणारे नामदार बाळासाहेब पाटील नाहीत.

या गावावरून खाली आल्यानंतर अनेक जण कंटाळले असतील.

मात्र त्यानंतरही पुढचे चार तास त्यांनी पाटण तालुक्यातील अनेक गावात जाऊन पाहणी केली.

नामदार बाळासाहेब पाटील जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जातात, तेव्हा कुटूंबातील सदस्याची आपुलकीने चौकशी करतात.

विद्यार्थी असेल तर त्याला पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन तर करतात.

याशिवाय त्यांच्या घरात ज्या गोष्टी नवीन पहायला मिळतात, त्याचे कौतुक करतात.

एखाद्या शेतकर्‍याच्या बांधावर जातात, तेव्हा ते ऊस लागणीपासून कोणती खते वापरली?

किती तारखेला ऊस लावला ? याचे संपूर्ण माहिती माहिती ते एक शेतकरी म्हणून घेतात.

नवीन पद्धतीने शेती करणार्‍या शेतकर्‍याला ते सतत पाठबळ तर देतातच.

मात्र स्वतःच्या शेतामध्ये त्याचे अनुकरण करत असतात.

सह्याद्रि कारखान्याचा शेती विभागातील अधिकार्‍यांना जेवढी माहिती नसेल, तेवढी शेतीची माहिती बाळासाहेब पाटील यांना आहे.

आणि असे चेअरमन राज्यात खूप कमी असतील.

नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हातून भविष्यात अजून फार मोठे काम होणार आहे.

कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प, विकासकामे पूर्ण करण्यासाठी नामदार बाळासाहेब पाटील यांना पुढील काळात शक्ती मिळो, हीच त्यांच्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !!!

हे ही पाहा : 

Back to top button