सातारा :आठवूनी चिऊ-काऊचा घास; घेऊ चिमणी संवर्धनाचा ध्यास | पुढारी

सातारा :आठवूनी चिऊ-काऊचा घास; घेऊ चिमणी संवर्धनाचा ध्यास

सातारा पुढारी वृत्तसेवा; मीना शिंदे : जागतिक तापमानवाढ आणि मानवी वसाहतींच्या अतिक्रमणांमुळे जंगले कमी होत आहेत. स्थलांतरितांचे लोंढे येऊन शहरे विस्तारली आहेत. सिमेट-काँक्रिटच्या इमारतींची संख्या वाढल्याने पूर्वी सर्रास अंगणात भुरभुरणार्‍या चिमण्यांचा वावर कमी झाला आहे; मात्र पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या अवलियांकडून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी, दाणा-पाण्याची व्यवस्था, कृत्रिम पाणवठे इत्यादींच्या माध्यमातून सिमेंटच्या जंगलातही पक्षी संवर्धनाचे काम होत आहे. ‘आठवूनी चिऊ-काऊचा घास; घेऊ चिमणी संवर्धनाचा ध्यास’ या उक्तीप्रमाणे सार्‍यांनीच अनुकरण करण्याची गरज आहे.

पूर्वी सुगीच्या दिवसांमध्ये आकडीची ज्वारीची कणसं मुद्दाम बाजूला काढली जात. घराच्या वळचणीला व मंदिरांबाहेर ही कणसं टांगली जात. चिमण्यांसह सर्वच पक्षी दाणे खाण्यासाठी येत. अंगणात सर्रास चिमण्यांचा वावर असे. परंतू आता हेचित्र बदलले आहे. जागतिक तापमानवाढ आणि मानवी वसाहतींच्या अतिक्रमणांमुळे जंगले कमी होत आहेत. स्थलांतरीतांचे लोंढे येवून शहरे विस्तारली आहेत.

सिमेट काँक्रीटच्या इमारतींची संख्या वाढल्याने पूर्वी सर्रास अंगणात भुरभुरणार्‍या चिमण्यांचा वावर कमी झाला आहे. सिमेंटची जंगले वाढली आहेत. मोबाईल, इंटरनेट सुविधेसाठी जागोजागी टॉवर उभारले जात आहेत. त्यामधून येणार्‍या तरंग लहरींमुळे मानवासह पक्षांच्या आरोग्यावर दुष्पपरिणाम जाणवत आहेत. त्यामुळे मानवी वस्तीमध्ये चिमण्यांचे दिसणे दुरापास्त झाले आहे. परंतू अशा परिस्थितीतही काही पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमी पक्षी संवर्धनासाठी धडपडत आहेत.

झाडे तुटल्याने हिरावलेली घरटी उभी करण्यासाठी नानाप्रकारे प्रयत्न करत आहेत. घराजवळ परसबागा फुलवून सावली तर देतातच त्याचबरोबर अंगणात चिमण्यांसाठी लाकूड-बांबू व पुठ्ठ्यांपासून घरटी बनवून ती टांगत आहेत. माळरानावर, डोंगर कपारी, शेतात व घराच्या टेरेसवर पक्षांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेत.

टाकावू वस्तूंपासून टिकाऊचा नारा देत जुनी भांडी, फुटके माठ, रिकाम्या प्लास्टिकचे कॅन, बाटल्यांमध्ये पाणी व खाद्य ठेवले जात आहे.
सातारा शहरासह ग्रामीण भागातही पक्षीसंवर्धनासाठी अनेक पक्षीप्रेमी, पर्यावरण अभ्यासक, सामाजिक संस्था यासाठी पुढे येत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही याबाबत जनजागृती केली जात आहे.

पक्षांनाही लागलाय लळा

सातारा उपनगरामध्येही एक अवलियाची पक्षीसंवर्धनासाठी धडपड सुरू आहे. चंदनगर, कोडोली येथील प्रकाश कदम यांच्या अंगणात दररोज चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येतो. कदम यांनी बांबूची घरटी अंगणात शेडमध्ये टांगली असून त्यामध्ये चिमण्यांबरोबर बुलबुल, साळुंकी, पोपट, होला वास्तव्य करत आहेत.

कोकीळ, खंड्या, सुगरण, कावळा, सातभाई हे पक्षी दाना-पाण्यासाठी येतात. इतरही अनेक पक्षी विनीच्या हंगामापुरते येथे मुक्कामी असतात. पक्षांनाही त्यांचा लळा लागल्यानेे ते या पक्षांसाठी वर्षभर कृत्रिम पाणवठे, अन्नाची व्यवस्था करतात.

Back to top button