सातारा : वाईजवळ कालव्यात बुडणार्‍या तीन लहानग्यांचे वाचवले प्राण | पुढारी

सातारा : वाईजवळ कालव्यात बुडणार्‍या तीन लहानग्यांचे वाचवले प्राण

वाई : पुढारी वृत्तसेवा : यशवंतनगर वाई येथे गुरुवारी सायंकाळी वाई-बावधन रोडवरील धोम उजव्या कालव्यामध्ये बुडणार्‍या तीन मुलांना राज सुनील मांढरे (रा गाढवेवाडी, ता. वाई) यांनी जीवाची बाजी लावून वाचवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला मंजुनाथ किशोर साळी (वय 13), आशिष दादासो साळी (वय 10), यश विजय पवार (वय 10, तिघे रा. यशवंतनगर वाई) या मुलांना बुडताना वाचवले.

गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान चुनाडेवस्ती यशवंनगर येथील मंजुनाथ साळी, आशिष साळी, यश पवार हे तिघे शाळा सुटल्यानंतर यशवंनगर हद्दीतील धोम डाव्या कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेले. यामधील मंजुनाथ साळी व यश पवार यांना थोडे पोहण्यास येत होते परंतु आशिष साळी याला पोहता येत नव्हते. दोघे पोहत असताना आशिष साळी याने कॅनॉलमध्ये उडी टाकली. पोहता येत नसल्याने आशिष पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी मंजुनाथ साळी गेला असता त्याला मिठी मारल्यामुळे तो ही बुडू लागला.

मुले साधारण तीनशे मीटर कालव्यातून वाहत पाण्याच्या प्रवाहात निघाली होती. दरम्यान परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान राज सुनील मांढरे हा विराटनगरवरून बालाजी नगरला कॅनॉलच्या रस्त्याने दुचाकीवरून चालला होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता मोबाईल व कपड्यांसह कॅनॉलमध्ये उडी मारून बुडत असलेल्या मुलांचे प्राण वाचवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

यावेळी सचिन दळवी, गणेश मालुसरे यांनी सहकार्य केले. पोलिसांना खबर दिल्यानंतर सहा पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंंबडे, उपनिरीक्षक के.डी. पवार, हवालदार अजित जाधव, देशमुख, चालक पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन राज मांढरे यांचे कौतुक केले.

Back to top button