सातारा : तापोळा-बामणोली पर्यटन आराखडा तयार करा | पुढारी

सातारा : तापोळा-बामणोली पर्यटन आराखडा तयार करा

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रातील तापोळा, बामणोली, मुनावळे, वाघोळी परिसर मुबलक पाणी आणि वन क्षेत्राने समृद्ध असल्याने पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. येथे पर्यावरणपूरक योजना आखून एकात्मिक पर्यटन साखळी निर्माण करण्यासाठी विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा पर्यटन क्षेत्राचा विकास करण्याबाबत शुक्रवारी मंत्रालयात बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या पर्यटकांना कोयना धरण परिसरात पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्यास मोठा वाव आहे. यादृष्टीने पहिल्या टप्प्यात नाशिक, गणपती पुळे देवस्थानच्या धर्तीवर बोट क्लब विकसित करता येईल.

पर्यटकांना सुविधा आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देता येईल. यासाठी एमटीडीसीने व्यवहार्यता तपासून विकास आराखडा तयार करावा. नंतरच्या टप्प्यात कॅराव्हॅन, तंबू, स्कुबा डायव्हिंग आदींचा विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले. पान 2 वर
ना. एकनाथ शिंदे म्हणाले, महाबळेश्वर आणि कास पठार येथे येणार्‍या पर्यटकांसाठी तापोळा, बामणोली, मुनावळे अशी पर्यटनाची एकात्मिक साखळी तयार करता येईल. यामुळे पर्यटनाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. यामुळे महाबळेश्वर आणि कास पठारावर येणारा पर्यटक या परिसराचा आनंद घेऊ शकेल. यासाठी महाबळेश्वर ते तापोळा रस्ता रूंद करण्यात येणार असून पाण्यात केबल स्टेड पूल आणि दर्शक गॅलरीही तयार करता येईल. काही ठिकाणी रोप वे उभारून निसर्गाचे नयनरम्य दर्शन घेता येईल.

ना. आदिती तटकरे म्हणाल्या, निसर्गाने नटलेल्या या परिसराचा विकास करताना पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचा विकास करावा. बोट क्लबच्या माध्यमातून स्थानिकांना प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध होईल. स्थानिक बोटींबरोबरच आधुनिक सुविधांचा मेळ साधावा. जल व साहसी पर्यटन, स्कूबा डायव्हिंग यात नाविन्यता आणावी.

एमटीडीसीच्या जल पर्यटन विभागाचे सारंग यांनी सादरीकरणाद्वारे या परिसरात विकसित करता येणार्‍या संभाव्य पर्यटन सुविधांबाबत माहिती दिली.

Back to top button