सातारा : उन्हाळ्याच्या दाहकतेने रस्ते ओस | पुढारी

सातारा : उन्हाळ्याच्या दाहकतेने रस्ते ओस

सातारा पुढारी वृत्तसेवा: सातारा जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढू लागली असून, भर दुपारी कडक उन्हाने रस्ते ओस पडू लागले आहेत. शीतपेये तसेच फळांना मागणी वाढल्याने दरही तेजीत आहेत.

जिल्ह्यात यावर्षी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवत आहे. विविध धरणांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातही भर दुपारी रस्ते ओस पडू लागले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील अनेक शहरांसह गावागावांत लिंबू सरबत, आईस्क्रीम आदी शीतपेयांना मागणी वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांनी आईस्क्रीम तसेच अन्य पेये विक्रेत्यांचे गाडे भर उन्हातही फिरताना दिसत आहेत.

ग्रामीण भागात उन्हाच्या दाहकतेपासून बचाव व्हावा, यासाठी बहुतांशी लोक झाडाखाली आराम करत असल्याचे दिसून येत आहे. बांधकाम करणारे कारागीर पहाटे पाचच्या सुमारास कामाला सुरुवात करून सकाळी 11 वाजता उन्हामुळे काम बंद करून सायंकाळी पुन्हा पाच नंतर कामाला सुरुवात करत आहेत.

वाढत्या उन्हाचा बांधकामासह अन्य व्यवसायावर मोठा परिणाम होवू लागला आहे. भर दुपारी बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सध्या उन्हाळी हंगामातील पिकांना शेतकरी पाणी देत असून उन्हाच्या काहिलीने शेतकरी, मजूरवर्ग त्रस्त होत आहे. बहुतांशी ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळच्या वेळीच मजूर काम करताना दिसत आहेत.

फळ बाजारात लाखोंची उलाढाल

उन्हाची तीव्रता वाढल्याने द्राक्षे, मोसंबी, संत्री, अननस, नारळ (शहाळे) आदी फळांना चांगली मागणी आहे. जस-जशी उन्हाळ्याची तीव्रता जास्त वाढेल तसतशी फळे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होणार आहे.

उन्हामुळे बाजारपेठेतही देशी फळांबरोबरच परदेशी फळांचीही आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सफरचंद, द्राक्षे, काळी द्राक्षे, चिकू, अननस, मोसंबी, संत्री आदी फळांना चांगली मागणी आहे. नागरिक नारळाचे पाणी जास्त पिताना दिसत आहेत.

उसाच्या रसालाही मागणी वाढली आहे. नारळाबरोबरच मोसंबी, संत्री, अननस, चिकू ही फळे खरेदी करताना नागरिक दिसत आहेत. त्यामुळे सध्या फळ बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा 

Back to top button