सातारा : केंजळ येथील तणाव अखेर निवळला | पुढारी

सातारा : केंजळ येथील तणाव अखेर निवळला

कवठे : पुढारी वृत्तसेवा

केंजळ (ता. वाई) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात प्रशासन व ग्रामस्थांमध्ये सामोपचाराने निर्णय घेण्यात आला. विना परवानगी बसवलेला पुतळा सुरक्षितस्थळी ठेवण्यात येणार असून आता कायदेशीर परवानगी घेऊन हा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसविण्याचे एकमताने ठरले. त्यामुळे शनिवारी दिवसभर निर्माण झालेला तणाव अखेर निवळला.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत हा पुतळा अन्यत्र हलविण्याचे काम सुरु होते. केंजळ येथील युवक व ग्रामस्थांनी शुक्रवारी मध्यरात्री ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात छत्रपती शिवरायांचा पुतळा चबुतरा बांधून त्यावर स्थापित केला. ही बाब सकाळी प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर महसूल व पोलिस प्रशासनाने केंजळ गावाकडे धाव घेतली. त्यामुळे तरुणांनीही केंजळ येथील चावडीसमोर प्रचंड गर्दी केली. प्रारंभी केंजळ ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार रणजित भोसले, अतिरिक्त डी. वाय. एस. पी. गणेश किंद्रे, वाईचे पो.नि. बाळासाहेब भरणे, भुईंजचे स.पो.नि. आशिष कदम व त्यांचे सहकारी यांच्यासोबत ग्रामस्थ व युवकांची बैठक झाली. बेकायदेशीरपणे बसविलेला पुतळा सन्मानपूर्वक काढून ग्रामपंचायत कार्यालयात किंवा अन्य सुरक्षितस्थळी ठेवण्याची विनंती प्रशासनाने केली.

त्यानंतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून रितसर जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घेऊन पुतळा बसविण्यात यावा, असेही सुचविण्यात आले. यावर पुतळ्याची देखभाल व रक्षण करण्यात येईल, मात्र पुतळा हटवणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. प्रशासनाने पुन्हा ग्रामस्थांना पुतळा हटविण्याची विनंती केली, मात्र पुतळा अन्यत्र हलविण्यास विरोध कायम राहिला. संदीप जायगुडे, दिनेश खैरे, संकेत येवले, चंदन संपकाळ, विश्वजित कदम, अमित कदम, प्रतिक मोहिते, सुमित चव्हाण, वरूण जंगम आदी तरुणांनी पुतळा हटविण्यास नकार दिला.

तोडगा निघत नसल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे ग्रामस्थ व प्रशासनाच्या बैठकांचे सत्र सुरूच होते. त्याच दरम्यान प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले यांनी केंजळ येथे धाव घेतली. त्यांनीही पुतळा हटवू देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्यासोबत वाई भाजपचे सरचिटणीस सचिन घाडगे, विवेक भोसले कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.

अखेर अतिरिक्त पोलिस अधीक्षक तानाजी बरड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थ, युवकांना प्रशासनाची भूमिका सांगितली. पुतळ्याच्या नियमावलीबाबत वारंवार सूचना केल्याने केंजळ ग्रामस्थ पुतळा हटविण्यासाठी तयार झाले. त्यानंतर पुतळ्याच्या सर्व बाजूंनी पोलिस वाहनांचा ताफा उभा करण्यात आला. पुतळा सुरक्षितपणे हलविण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरु होते. कायदेशीर सर्व परवानग्या घेऊन हा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसविण्यात येणार आहे. दरम्यान, पुतळा हटवायला सांगितल्यामुळे केंजळ परिसरातील शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

Back to top button