राजधानी दिल्लीत ‘कास’ असणार ‘खास’ - पुढारी

राजधानी दिल्लीत ‘कास’ असणार ‘खास’

सातारा : महेंद्र खंदारे

‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या थीमखाली यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये सातार्‍याचे ‘हार्ट’ समजल्या जाणार्‍या कास पठाराला खास स्थान देण्यात आले आहे. प्रजासत्ताकदिनी होणार्‍या परेडमध्ये ‘कास’ मॉडेलमुळे राजधानी दिल्लीत सातार्‍याचा डंका वाजणार आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथात काससह राज्यप्राणी शेकरू, राज्य फुलपाखरू ‘ब्लू मॉर्मन’ यांचाही समावेश आहे.

प्रजासत्ताकदिनी नवी दिल्ली येथे दरवर्षी परेड होत असते. या परेडमध्ये प्रत्येक राज्याचे चित्ररथ असतात. या चित्ररथामधून प्रत्येक राज्य आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत असते. यंदा दिल्ली येथे होणार्‍या परेडमध्ये राज्याची समृद्ध जैवविविधता दाखवणे, या उद्देशाने महाराष्ट्राचा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. नागपूर येथील एका ठेकेदाराने हा चित्ररथ तयार करण्याचे कंत्राट घेतले. मात्र, याचे प्रत्यक्ष काम यवतमाळ जिल्ह्यातील भूषण मानेकर या कलाकाराने केले आहे

या चित्ररथाचे वेगवेगळे पार्ट तयार करून ते दिल्लीत नेऊन एकत्रित रथावर जोडण्यात आले आहेत. रविवारपासूनच प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू झाला आहे. यामध्ये विविध बटालियन्सच्या परेड व विविध राज्यांच्या चित्ररथांची रंगीत तालीम म्हणून पहिली झलक पाहायला मिळाली. यामध्ये महाराष्ट्राने तयार केलेल्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पूर्ण राज्याची जैवविविधता एकाच फ्रेममध्ये दाखवण्यात आली असल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथावर मुख्य मॉडेल कास पठाराचे आहे. तेे चित्ररथाच्या अग्रभागी ठेवले गेले आहे. ट्रॉलीच्या पुढील बाजूस कास पठारावर आढळणार्‍या ‘सुपरबा’ या जंगली फुलाचे तसेच दुर्मीळ अशा सरड्याचे तीन फूट उंच मॉडेल आहे. कास पठाराप्रमाणेच माळढोक पक्षी, ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि खेकड्याच्या नवीन शोधलेल्या प्रजातींचे मॉडेल देखील रथावर आहेत. याशिवाय, यात वाघ, फ्लेमिंगो, मासे, गिधाड आणि घुबडाचे मॉडेल आहे.

चित्ररथाच्या अग्रभागी ‘कास’चे मॉडेल

महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये मुख्य मॉडेल कास पठाराचे असेल जे चित्ररथाच्या अग्रभागी ठेवले गेले आहे. ट्रॉलीच्या पुढील बाजूस कास पठारावर आढळणार्‍या ‘सुपरबा’ या जंगली फुलांचे तसेच दुर्मीळ सरड्याचे तीन फूट उंच मॉडेल आहे. त्यामागे ‘हरियाल’चे मॉडेल आहे. राज्य फुलपाखरू असलेल्या ‘ब्लू मॉर्मन’ने कास पठाराची शान आणखी वाढवली आहे. तसेच राज्य प्राणी ‘शेकरू’च्या मॉडेलचाही समावेश आहे. आंब्याच्या झाडाचे 14 फूट उंच मॉडेल आहे.

Back to top button