सातारा : शाहूपुरीकरांची स्वप्नपूर्ती केल्याचे समाधान- आ. शिवेंद्रराजे | पुढारी

सातारा : शाहूपुरीकरांची स्वप्नपूर्ती केल्याचे समाधान- आ. शिवेंद्रराजे

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा शहरालगतचे एक मोठे उपनगर असलेल्या शाहूपुरीचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शाहूपुरीतील प्रत्येक नागरिकांच्या घरात पाणी पोहचवण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. याचे समाधान असल्याचे प्रतिपादन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.

शाहूपुरीकरांना पाणी पुरवठा व्हावा यासाठी कण्हेर पाणी पुरवठा योजनेचा 31 कोटींहून अधिक रकमेचा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर हा मंजूर झाला. मध्यंतरी अनेक कारणांमुळे या योजनेचे काम रेंगाळले होते. यानंतर पुन्हा जीवन प्राधिकरणाच्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात आला. यामध्ये अडथळा असलेल्या वन विभागाच्या परवानगीबाबतही आ. शिवेंद्रराजे यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या. तसेच उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून अतिरिक्त 12 कोटींचा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळेच शाहूपुरीतील प्रत्येक नागरिकाच्या घरात आज पाणी पोहचले आहे.

31 डिसेंबर रोजी या योजनेचा लोकार्पण सोहळा आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला होता. सद्यस्थितीत कनेक्शन शिफ्टींगचे काम पूर्णत्वास जाईपर्यंत नवीन कण्हेर योजनेचे पाणी आहे त्या कनेक्शन मधूनच नागरिकांना पाणी दिले जाणार आहे. रांगोळे कॉलनी व सुर्यवंशी कॉलनी- दौलतनगर येथील बांधलेल्या नवीन योजनेतील पाण्याच्या टाक्यापर्यंत पाणी पोहचण्यासाठीची चाचणी घेण्यात आली आहे. काही ठिकाणी असलेले किरकोळ लिकेजेस काढल्यानंतर कनेक्शन शिफ्टिंग पूर्णत्वानंतर या दोन्ही टाक्यांवर आधारित असलेल्या नागरिकांनाही लवकरच या कण्हेर योजनेचे पाणी मिळणार आहे.

या योजनेची आखणी करतेवेळीच वाढीव लोकसंख्या विचारात घेवून हा प्रस्ताव तयार करण्यात आल्याने शाहुपूरीकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे. याबद्दल शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले, सहकारी व नागरिकांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले आहे.

Back to top button