आंबेनळी घाट दुरुस्तीसाठी तत्काळ १५.२५ कोटी मंजूर | पुढारी

आंबेनळी घाट दुरुस्तीसाठी तत्काळ १५.२५ कोटी मंजूर

महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा

जुलैमधील अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील आंबेनळी घाट रस्त्याची चाळण झाली होती. रस्त्याचे अक्षरश: वाभाडे निघाले होते. वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याबाबत दै. ‘पुढारी’ने शुक्रवारी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून शासकीय अनास्थेवर प्रहार केला. त्याची गंभीर दखल घेत आ. मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत पूरहानी दुरुस्ती अंतर्गत तातडीने 15.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्यामुळे कोकणला जोडणार्‍या या घाट रस्त्याच्या कामाला आता वेग येणार आहे. विशेष म्हणजे ‘पुढारी’च्या दणक्याने 24 तासात 15.25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

महाबळेश्वर – पोलादपूर दरम्याच्या आंबेनळी घाटाची जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे दुर्दशा झाली होती. कोकणाला जोडणार्‍या या मुख्य घाटमार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने मोठे नुकसान झाले होते. प्रामुख्याने किल्ले प्रतापगड परिसरातील 22 गावांचा संपर्कच तुटला होता. या घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांसमवेत आ. मकरंद पाटील यांनी पाहणी करून काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रामुख्याने मेटतळे या गावापासून काही अंतरावर मुख्य रस्ताच सुमारे तीस फूट खोल खचला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने याठिकाणी भराव टाकून रस्त्यावर जाळीचे बेड तयार करून दुरुस्ती केली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये आंबेनळी घाटातील रस्त्याची नुकसानीची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांनी केली होती. यावेळी ना. अजित पवार यांच्याकडे आ. मकरंद पाटील यांनी दुरुस्तीसाठी भरीव निधींची तरतूद करण्याची मागणी केली होती. या घाटरस्त्याच्या दुरवस्थेबाबतची दै. ‘पुढारी’ने आवाज उठविला होता.

निधीसाठी आ. मकरंद पाटील यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यामुळे तब्बल 1525 लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून या निधीमधून रस्ते मार्गावरील मोर्‍यांची दुरुस्ती, पुलांची दुरुस्ती – पुनर्बांधणी, संरक्षक भिंतीचे काम, आंबेनळी घाट व पांगरी फाटा ते पाचगणी या भागातील खराब डांबरी पृष्ठभागाची सुधारणा करण्याची कामे होणार आहेत. आ मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून हा भरीव निधी मिळाला असून या निधीतून आंबेनळी घाटरस्त्याचे काम युद्धपातळीने होणार आहे.

आंबेनळी घाट हा कोकणाला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. अतिवृष्टीमुळे या रस्त्याची मोठी हानी झाली. तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्तीनंतर वाहतूक पूर्ववत झाली होती. मात्र, या घाट रस्त्याच्या कामासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याप्रश्नी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे 15.25 कोटी रुपये तातडीने मंजूर झाले आहेत. त्यामुळे कामे आता वेगाने होतील.

– आमदार मकरंद पाटील, जावळी

Back to top button