अंबेनळी घाटातील 30 फूट खचलेला रस्ता अद्यापही धोकादायक | पुढारी

अंबेनळी घाटातील 30 फूट खचलेला रस्ता अद्यापही धोकादायक

महाबळेश्‍वर ; प्रेषित गांधी : महाबळेश्‍वर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंबेनळी घाटरस्त्याची पार चाळण झाली होती. हा घाटरस्ता बंद झाल्याने किल्ले प्रतापगड परिसरातील 22 गावांचा संपर्क तुटला होता. शिवाय, अंबेनळी घाटरस्ता कोकणला जोडत असल्याने पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणातील दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली होती. कडा तुटून अंबेनळी घाटरस्ता धोकादायक बनल्याला तब्बल पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, शासकीय अनास्थेमुळे घाटरस्त्याची पुरेशी दुरुस्ती न झाल्याने वाहनचालकांना तळहातावर जीव घेऊनच या घाटातून प्रवास करावा लागत आहे.

महाबळेश्‍वर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रतापगड परिसराचे अतोनात नुकसान झाले. अतिवृष्टीच्या मार्‍यामुळे सह्याद्रीचा डोंगरकडा तुटल्याने अंबेनळी घाटरस्त्याचे रूपांतर एका मोठ्या नाल्यामध्ये झाले होते. या घाटरस्त्यावर 30 हून अधिक छोट्या-

मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. काही ठिकाणी रस्ते दुभंगले होते, तर मेटतळे गावापासून अंदाजे एक ते दोन कि.मी. अंतरावर मुख्य रस्ता 30 फूट खोल खचल्याने वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. या घाटरस्त्यावरचे मोठमोठे दगड, झाडे, माती उन्मळून खाली आल्यामुळे किल्ले प्रतापगड परिसरातील 22 गावांचा संपर्क तुटला. हाच घाटरस्ता कोकण विभागाला जोडत असल्याने या भागातील नागरिकांची दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली होती. या घाटरस्त्याची कामे युद्धपातळीवर होणे गरजेचे होते; पण तसे घडले नाही.

प्रतापगड परिसरातील गावकर्‍यांनी भराव टाकून दुरुस्त केला रस्ता

मेटतळेपासून काही अंतरावर मुख्य रस्ताच सुमारे 30 फूट खचला होता. किल्ले प्रतापगडच्या पर्यटनावर उपजीविका असलेले गाईड आणि काही दुकान व्यावसायिकांनी उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने मेटतळेच्या मुख्य रस्त्याची वाहतूक सुरळीत करण्यासाठी भराव टाकून रस्त्यावर जाळीचे बेड तयार केले. त्या बेडमध्ये दगड भरून खचलेला रस्ता जोडण्यात आला. जवळपास 5 मीटर रुंदीचा रस्ता येथे तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आल्याने दीड महिन्याच्या कालावधीनंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरू झाली होती. तोपर्यंत तरी सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेतच होता.

40 कि.मी. घाटरस्त्याचे महामार्गासारखे रुंदीकरण आवश्यक

या घाटरस्त्याचे आता पूर्णपणे महामार्गासारखे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. संरक्षक कठडे निर्माण करत सुरक्षित वाहतुकीचे नियोजन होणे गरजेचे आहे. अनेक धोकादायक वळणे रुंद झाली पाहिजेत. अंबेनळी घाटरस्त्याची लांबी 40 किलोमीटर इतकी आहे. घाटाची उंची 2,100 फूट आहे. पश्‍चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेतील हा घाट आहे. रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा घाट आहे. पोलादपूर हे या घाट पायथ्याचे, तर महाबळेश्‍वर हे घाट माथ्याचे पर्यटन क्षेत्र आहे.

पूरहानी दुरुस्तींतर्गत डिसेंबर महिन्यात शासनाने या घाटरस्त्यावरील कामांना मान्यता दिली. पडझड झालेल्या ठिकाणांच्या दुरुस्तीची कामे मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे बांधकाम विभागाचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मद्देश गोंजारी यांनी सांगितले.

अंबेनळी घाट ब्रिटिशकालीन; रुंदीकरण नाही

अनेक ठिकाणी संरक्षक कठडेच दरडीखाली गेले असून, काही ठिकाणी बांधकाम विभागाने रिफ्लेक्टर पट्टी लावली आहे. अंबेनळी घाट रस्ता हा ब्रिटिशकालीन असल्याने सध्या गैरसोयीचा व धोकादायक बनला आहे. जीवावर उदार होऊनच प्रवासी व मालवाहतूक या मार्गावर सुरू असते. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे घाटरस्ता खचणे, वाहून जाणे, झाडे पडणे, दरडी कोसळणे यामुळे गेल्या काही वर्षांत वारंवार हा घाटरस्ता बंद ठेवावा लागतो.

Back to top button