सातारा पाटण...पाटणकरांच्या ‘राष्ट्रवादी’चेच - पुढारी

सातारा पाटण...पाटणकरांच्या ‘राष्ट्रवादी’चेच

पाटण : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या पाटण नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर गटाने निर्विवाद विजय मिळवला आहे. शिवसेना नेते तथा गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई समर्थक बहुसंख्य उमेदवारांचा पराभव झाला आहे. 15 जागा जिंकून सत्ताधार्‍यांनी बहुमत मिळवले असून ना. शंभूराज देसाई समर्थक दोन उमेदवारांनी विजय मिळवला आहे. विद्यमान नगराध्यक्ष अजय कवडे व माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले आहे.

पाटण नगरपंचायतीच्या सतरा प्रभागांची मतमोजणी बुधवारी शांततेत पार पडली. एकमेव विद्यमान नगरसेवक असलेल्या सागर मानेंचा पराभव झाल्याने भाजपाला एकही जागा मिळू शकली नाही. राष्ट्रीय काँग्रेसच्या सातही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. काही ठिकाणी भाजपा, काँग्रेस उमेदवारांपेक्षाही नोटाला जास्त मतदान झाल्याने संबंधितांवर नामुष्की ओढवली आहे.

बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण येथे निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिषेक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली. प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे- प्रभाग क्रमांक एक स्वप्निल माने (331), गणेश भिसे (82), तुषार कांबळे (21), प्रभाग दोन सुषमा गणेश मोरे (204), सविता राजेंद्र मोरे (137), विद्या वायदंडे (3), वैशाली देवकांत (1), प्रभाग तीन जगदीश शेंडे (236), सागर माने (208), नितीन पिसाळ (33), सचिन लवलेकर (17), रामचंद्र माळी (4), प्रभाग चार राजेंद्र राऊत (247), संजय चव्हाण (210), शंकर कुंभार (9), प्रभाग पाच संजना जवारी (231), सोनाली पवार (111), सुभद्रा देशमुख (36), साधना फुटाणे (2), प्रभाग सहा सागर पोतदार (244), नानासोा पवार (139), वीरेंद्र खैरमोडे (95), प्रभाग सात सोनम फुटाणे (272), जयश्री शिंदे (41), प्रभाग आठ संज्योती जगताप (274), स्मिता पवार (139), वंदना जाधव (27), ज्योती जाधव (41), सुवर्णा माने (84), गंगा भोळे (33), प्रभाग नऊ संतोष चंद्रकांत पवार (266), संतोष शंकर पवार (169), प्रभाग दहा किशोर गायकवाड (84), चंद्रकांत देसाई (75), संतोष इंदुलकर (29), अजय कवडे (26), सुधीर पाटणकर (16), अभिजित यादव (10), प्रभाग अकरा सचिन कुंभार (269), राहुल देवकांत (147), दर्शन कवर (3), रणजीत भाटी (3), प्रभाग बारा अनिता देवकांत (118), पूनम घोणे (102), गौरी सूर्यवंशी (5), श्वेता देवकांत (19), प्रभाग तेरा मिनाज मोकाशी (183), सुलताना हकीम (117), वैशाली जाधव (124), श्रद्धा कवर (9), प्रभाग चौदा आस्मा इनामदार (202), शबाना मुकादम (167), हिराबाई कदम (1), श्रद्धा कवर (3), प्रभाग पंधरा शैलजा पाटील (199), वैशाली पवार (173), अश्विनी शेलार (6), प्रभाग सोळा मंगल शंकर कांबळे (166), प्रणिता संतोष कांबळे (145), प्रभाग सतरा उमेश टोळे (361), चंद्रकांत चौधरी (195), दर्शन कवर (2) अशा पद्धतीने उमेदवारांना मते पडलेली आहेत.

24 उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त…

62 उमेदवारांमध्ये शिवसेनेच्या 16 पैकी 4, भाजपच्या 5 पैकी 4, काँग्रेसच्या सर्व सात व अपक्ष 9 अशा 24 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. शिवसेनेच्या विद्या वायदंडे, शहर प्रमुख शंकर कुंभार, गंगा भोळे, अभिजित यादव, भाजपाचे तुषार कांबळे, साधना फुटाणे, रणजित भाटी, हिराबाई कदम, राष्ट्रीय काँग्रेसच्या वैशाली देवकांत, दर्शन कवर, श्वेता देवकांत, श्रद्धा कवर, अश्विनी शेलार, अपक्ष अजय कवडे, नितीन पिसाळ, सचिन लवलेकर, रामचंद्र माळी, सुभद्रा देशमुख, वंदना जाधव, ज्योती जाधव, सुधीर पाटणकर, गौरी सूर्यवंशी या उमेदवारांचा यात समावेश आहे.

सत्यजितसिंह पाटणकरांचा करेक्ट कार्यक्रम…

सातारा जिल्हा बँकेनंतर विजयाची परंपरा कायम राखणे सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासाठी एक आव्हान होते. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटणमध्ये पॅनेल उभे करून मोठी ताकद लावली होती. जिल्ह्यासह तालुकास्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फौज होती. सत्यजितसिंहांचा 17 -0 चा करेक्ट कार्यक्रम नियोजित होता. मात्र अवघ्या दोन ठिकाणी शिवसेना समर्थक उमेदवारांना निसटता विजय मिळाला. सत्यजितसिंह पाटणकर यांनी 17 पैकी 15 जागांवर निर्विवाद बहुमत मिळवत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे बोलले जात आहे.

नावलौकिक वाढवणार

कोणताही गटतट न पाहता सामान्यांना केंद्रबिंदू मानत विकासकामे करावीत. तसेच पाटणचा नावलौकिक वाढण्यासाठी आपणास साथ द्या, असे आवाहन सत्यजितसिंह पाटणकर यांनी विजयी उमेदवारांना केले आहे. तसेच हा विजय जनतेला समर्पित करत असल्याचेही सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगितले.

Back to top button