पाटण : शेततळ्यात बुडून बहिण-भावाचा मृत्यू - पुढारी

पाटण : शेततळ्यात बुडून बहिण-भावाचा मृत्यू

पाटण ; पुढारी वृत्तसेवा : मोठा भाऊ पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या बहिणाचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रोमनवाडी-येराड (ता. पाटण) येथे सोमवार (दि. १७ रोजी) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मच्छीमार करणार्‍या मुलांच्या मदतीने रात्री उशिरा संबंधित बहिण-भावाचा मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

सौरभ अनिल पवार (वय १६) व पायल अनिल पवार (वय १४, रा. काठी, ता. पाटण) अशी शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या बहिण भावाची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा येथील एका व्यक्तीचे रोमनवाडी-येराड येथे फार्महाऊस आहे. तेथून जवळच शेततळे असून ते पाण्याने काठोकाठ भरले आहे. या फार्महाऊसवर रोमनवाडीतील सचिन जाधव हे कामास आहेत. सोमवारी सचिन यांचे काठी येथील पाहुणे अनिल पवार हे पत्नीसह मुलगा सौरभ, मुलगी पायल यांना घेऊन रोमनवाडी येथे गेले होते.

सर्वजण फार्महाऊसवर असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सौरभ आणि पायल शेततळ्याकडे गेले. त्यावेळी सौरभचा पाय घसरल्यामुळे तो शेततळ्यात पडला. तो बुडत असताना पायलने आरडाओरडा करत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पायलही तळ्यात पडली. ही घटना निदर्शनास येताच सचिन जाधव यांच्यासह मुलांच्या आई-वडिलांनी तळ्याकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सौरभ आणि पायल तळ्यात बुडून दिसेनाशी झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी पायल व सौरभ यांचा शोध घेण्यासाठी मच्छिमारांना बोलवले. रात्री उशीरा दोघांचाही मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी सरपंच प्रकाश साळुंखे, गावकामगार तलाठी पी. जी. शिंदे हेही घटनास्थही हजर होते. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात झाली नव्हती.

नातेवाईकांनी फोडला हंबरडा..

काठी (ता. पाटण) येथील अनिल पवार हे गत काही वर्षांपासून कामानिमित्त पत्नी व मुलांसमवेत विजयनगरमध्ये वास्तव्यास आहेत. मुलगा सौरभ हा रेठरे येथील आयटीआय महाविद्यालयात शिकत होता. तर मुलगी पायल ही विजयनगर येथील हायस्कुलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होती. सोमवारी सौरभ व पायल हे आई-वडीलांसह रोमनवाडी-येराड येथे पाहुण्यांकडे गेल्यानंतर त्यांच्यावर काळाने घाला घातला. यावेळी नातेवाईकांनी हंबरडा फोडल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी उभा राहिले.

Back to top button