महाबळेश्‍वर गोठले; पारा शून्य | पुढारी

महाबळेश्‍वर गोठले; पारा शून्य

महाबळेश्‍वर ; पुढारी वृत्तसेवा : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले महाबळेश्‍वर मंगळवारी रात्री अक्षरश: गोठले. पारा शून्य अंशापर्यंत खाली घसरल्याने थंडीत प्रचंड वाढ झाली. वेण्णालेक, लिंगमळा परिसरात फुलझाडांसह वाहनांच्या टपावरही बर्फ साचला. वेण्णालेकच्या जेटीवरही हिमकणांचा सडा पडला होता. अवघ्या परिसरातील दवबिंदूंचे रूपांतर हिमकणात झाले होते. लिंगमळानजीकच्या स्मृतिवनात लांबच लांब हिमकणांचा गालिचा पसरल्याचे मनोहारी द‍ृश्य बुधवारी सकाळी पाहावयास मिळाले.

थंडीचा बालेकिल्ला असलेला महाबळेश्‍वर बुधवारी गारठून गेला. कडाक्याच्या थंडीने जनजीवनाला हुडहुडी भरली. वेण्णालेक परिसरात मंगळवारी रात्री शून्य अंश तापमानाची नोंद झाली. बुधवारी पहाटे तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसवर राहिले. लिंगमळा परिसरातील स्मृतिवन भागात तर गवतावर, झाडाझुडपांवर हिमकणांचा गालिचा अंथरल्याचे मनोहारी द‍ृश्य पाहावयास मिळाले.

महाबळेश्‍वर
महाबळेश्‍वर : लिंगमळानजीक स्मृतिवनात फुलझाडांवर हिमकणांचा गालिचा पसरल्याचे मनोहारी द‍ृश्य.

वाहनांच्या टपावरदेखील हिमकण जमा झाले होते. फुलांनीही हिमकणांची नक्षी पांघरली होती. या हंगामात हिमकण होण्याची ही पहिलीच वेळ असून थंडीचा कडाका असाच कायम राहिला, तर वेण्णालेक परिसरामध्ये पुन्हा हिमकण पाहण्याचा अनुभव स्थानिक लोक तसेच पर्यटकांना मिळेल.

महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य येथे अनुभवायास मिळत आहे. विशेषत: वेण्णालेक परिसर, लिंगमळा भागात थंडी चांगलीच जाणवत आहे. महाबळेश्‍वर सोडून 20 कि.मी खाली गेल्यावर असणारी बोचरी थंडी व महाबळेश्‍वरमध्ये असणारी गुलाबी थंडी यातील फरक येथे अनुभवायास मिळत आहे.

महाबळेश्‍वर
वाहनांच्या टपावर बर्फ साचून राहिला होता.

बुधवारी पहाटे वेण्णालेक परिसर धुक्याच्या दुलईत न्हाऊन निघाला. चारचाकी वाहनांच्या टपावर, पानांवर, वेण्णालेकच्या लोखंडी जेटीवर दवबिंदू गोठून हिमकण जमा झाल्याचे चित्र पहायला मिळाले. स्मृतिवन परिसरात सर्वाधिक हिमकण जमा झाले होते. येथे थंडीचे प्रमाण वेण्णालेकपेक्षा अधिक जाणवत होते.

तापमान पाहायचेय… मुंबई वेधशाळेशी करा संपर्क

महाबळेश्‍वर येथे राहुरी कृषी विद्यापीठ संचलित गहू गेरवा संशोधन केंद्र असून गव्हाच्या तांबेरा रोगावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली येथे संशोधन केले जाते. हे गहू गेरवा संशोधन केंद्र वेण्णालेक परिसरातच आहे. याच परिसरात स्ट्रॉबेरीची शेती, प्रसिद्ध वेण्णालेक तलाव आहे. थंडीच्या हंगामात हिमकणांची नजाकत येथे अनुभवायास मिळते. यापूर्वी गहू गेरवा संशोधन केंद्रावर पाऊस, हवामान, आर्द्रता कमाल व किमान तापमानाची नोंद ठेवण्यात येत होती.

तेथे दर्शनी भागावर असलेल्या फलकावर पर्यटकांसह स्थानिकांना रोजच्या हवामान बदलाची, पावसाची आकडेवारी रोजच्या रोज दिली जात होती. मात्र, हवामान खात्याचे कार्यालय महाबळेश्‍वर येथे असतानादेखील येथे हवामानात होणार्‍या बदलाच्या नोंदी ठेवल्या जात नाहीत. या नोंदींबाबत विचारणा केल्यावर यासंदर्भात कुलाबा (मुंबई) वेधशाळेशी संपर्क साधा, असे उत्तर देण्यात येते.

Back to top button